भोर तालुक्यात राजकीय वातावरण तापलं! आज सुनेत्रा पवारांची भोरमध्ये उपस्थिती तर उद्या महविकास आघाडीची माळेगांवात सभा; सुप्रिया सुळेंसोबत आमदार संग्राम थोपटेही राहणार उपस्थित
भोर : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांनी वेगळी चूल मांडल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकण्याचा चंग बांधला आहे. कुठल्याही लोकसभा मतदारसंघापेक्षा जास्त ताकद अजितदादा बारामतीत लावताना पाहायला मिळत आहेत. बारामतीत सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी नंणद भावयजीची थेट लढत अटळ असल्याची चिन्हं आत्तापासूनच दिसू लागलीत. कारण सुप्रियाताईंचा प्रभाव असलेल्या भोर मध्ये दस्तुरखुद्द अजितदादांनी दि. २४ फेब्रुवारी रोजी झंझावाती सभा घेतली होती. परंतु त्याच दिवशी सुप्रियाताईंनी देखील भोर शहरात वाघजाई यात्रोत्सवानिमित्त होणाऱ्या कुस्त्यांच्या आखाड्यात उपस्थिती दर्शवली होती.
दरम्यान, आज शुक्रवारी(दि. १ मार्च) भोर येथे सुनेत्रा पवार या भोर तालुका महीला स्वयंसाहयता गट कौशल्य विकास व क्षमता बांधनीसाठी घेण्यात आलेल्या एक दिवसीय कार्यशाळेसाठी सह्याद्री मंगल कार्यालय(महाड- पढंरपुर रोड) येथे उपस्थित राहिल्या होत्या. येथील सभा आटोपल्या नंतर सुनेत्रा पवार यांनी अनंतराव थोपटे यांची भेट घेतली तेव्हा संग्राम थोपटे यांच्या पत्नी स्वरुपा थोपटे आणि पुत्र पृथ्वीराज थोपटे हे देखील उपस्थित होते. तर संग्राम थोपटे विधानसभेच्या अधिवेशनामुळे सध्या मुंबईत आहेत. या भेटीवेळी सुनेत्रा पवार यांनी अनंतराव थोपटे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. थोपटे कुटुंबीय आणि सुनेत्रा पवार यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात असतानाच पुन्हा एकदा उद्या सुप्रिया सुळे भोर मध्ये उपस्थित राहणार आहेत. आणि विशेष म्हणजे ही सभा महविकास आघाडीची असून त्यासाठी आमदार संग्राम थोपटेही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे भोर तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसत आहे. ही सभा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या माळेगांव(नसरापूर, ता.भोर) येथेच दुपारी ३:३० वाजता होणार आहे.
परंतु दोघांचाही इरादा अगदीच स्पष्ट आहे. ताईंना बारामती राखायचीय तर दादांना तीच बारामती आता सुनेत्रा वहिणींच्या ताब्यात द्यायचीय. तसेच ही बैठक महाविकास आघाडीची असल्यामुळे संग्राम थोपटेंचे कट्टर विरोधक समजले जाणारे उ.बा.ठा.(शिवसेना) गटाचे कुलदीप कोंडे उपस्थित राहणार का? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
तसे पाहायला गेले तर सुप्रिया ताई यांचा गावभेट दौरा हा आज शुक्रवारी(दि. १ मार्च) असल्याचे शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या भोर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले होते. परंतु हा दौरा अचानक रद्द करण्यात आला. सुनेत्रा पवार यांच्या सभेला राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची जास्त गर्दी होईल, म्हणून कदाचित हा दौरा रद्द करून उद्या आमदार संग्राम थोपटें सोबत महविकास आघाडीची एकत्रित सभा घेण्यात आली असल्याची चर्चा भोर तालुक्यातील जनतेत रंगली आहे.