राजगडच्या सुवेळा माचीच्या मार्गावर दरड कोसळली; पहारेकरी, सुरक्षारक्षकाने ढिगारे बाजूला करत मार्ग केला मोकळा
राजगड(वेल्हे) – राजगड किल्ल्याच्या सुवेळा माचीच्या पायी मार्गांवर कड्याची मोठी दरड उन्मळून कोसळल्याची घटना घडली. ही घटना गुरुवारी(दि. २९ ऑगस्ट) रात्रीच्या सुमारास घडली. रात्री दरड कोसळल्याने सुदैवाने दुर्घटना टळली. सुट्टीच्या दिवशी तसेच इतर दिवशी शेकडो पर्यटकांची वर्दळ किल्ल्यावर असते. ही दरड कोसळल्याने सुवेळा माचीकडे जाणारा शंभर ते दीडशे फूट अंतराचा पायी मार्ग दरडीच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेला होता.
पर्यटकांमुळे शुक्रवारी पहाटे ही घटना आली उघडकीस
शुक्रवारी(दि ३० ऑगस्ट) सकाळी राजगडाचे पुरातत्व विभागाचे पहारेकरी बापु साबळे नेहमी प्रमाणे आले असताना काही पर्यटकांनी पाऊल वाटेवर मोठी दरड कोसळल्याचे सांगितले. सकाळी रिमझिम पाऊस असल्याने दरडीचा मलवा दुर करण्यात अडथळे येत होते. पाऊस थांबल्यावर
बापु साबळे आणि सुरक्षा रक्षक आकाश कचरे या दोघांनी खडतर परिश्रम करत फावड्यांनी दरडीच्या मुरुम, दगड, मातीचे ढिगारे बाजूला हटवले. जवळपास चार तासांनंतर दरड काढण्यासाठी दोघांनी जीवाची पर्वा न करता प्रयत्नाची पराकाष्ठा केली. अखेर दुपारी तीन वाजता पाऊल वाटेवरील दरड बाजुला काढून मार्ग मोकळा करण्यात आला.
“रात्री च्या सुमारास दरड कोसळल्याने सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. राजगड किल्ल्यावर व परिसरात दाट धुके असून पाऊसही पडत आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी दरड बाजुला काढून मार्ग मोकळा केला असला तरी पावसामुळे दरडी कोसळत आहेत तसेच पायऱ्या, पाऊल वाटा पावसामुळे निसरड्या झाल्या आहेत त्यामुळे पर्यटकांनी खबरदारी घ्यावी.”
– पहारेकरी बापु साबळे