भाटघर धरणात फक्त दहा टक्के पाणीसाठा शिल्लक; प्रकल्पग्रस्त पुनर्वसन समितीच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर पाण्याचा विसर्ग थांबवला
भोर : भाटघर धरणातून मागील अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु होता. यामुळे भविष्यात भाटघर धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या ४२ गावातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे धरणात फक्त ११ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्यामुळे नंतर आगामी पाणीटंचाईची परिस्थिती पाहता भाटघर धरणातील पाण्याचा विसर्ग थांबवण्यासाठी प्रकल्पग्रस्त पुनर्वसन समितीच्या ४२ गावातील लोकांनी आक्रमक पवित्रा घेऊन निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा आणि जलसमाधी घेण्याचा इशारा दिला. अखेर या शुक्रवारी(दि. १९ एप्रिल) सायंकाळी भाटघर धरणातील पाण्याचा विसर्ग पाटबंधारे विभागाने बंद केला. पाण्याचा विसर्ग बंद केल्या नंतर शुक्रवार अखेर भाटघर धरणामध्ये फक्त दहा टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
मागीलवर्षी यावेळेस भाटघर धरणात तीस टक्के पाणीसाठा शिल्लक होता. तसेच भाटघर धरण दरवर्षी पूर्ण क्षमतेने पावसाळ्यात भरते आणि उन्हाळ्यात सदरचे पाणी नीरा नदीतून वीर धरणात तसेच फलटण, इंदापूर, माळशिरस, बारामती या तालुक्यातील गावांना शेतीसाठी आणि पिण्यासाठी जाते. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात धरणे रिकामी होतात. त्यामुळे एप्रिलनंतर धरणाच्या कामासाठी जमिनी सोडलेल्या ४२ गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होतो.
या दरम्यान भाटघर धरण पुनर्वसन समितीच्या वतीने कार्यकारी अभियंता यांना निवेदन देताना काळूराम मळेकर, सोमनाथ वचकल, नितीन बांदल, सचिन बांदल, अंकुश खंडाळे, अभिषेक येलगुडे, संतोष बांदल उपस्थित होते. त्याची दखल घेत भाटघर धरणातील पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला असून यामुळे भाटघर धरण पुनर्वसन समितीच्या लढ्याला यश आले असल्याचे पहायला मिळत आहे.