वरंधा घाटाने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; आजपासून “या” तारखेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकींसाठी घाट बंद
भोर : पावसाळ्यातील संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी आणि त्या अनुषंगाने आवश्यक उपाय योजना करण्यासाठी प्रशासनाने भोरमार्गे महाडला जाणाऱ्या वरंधा घाट मार्गावरील सर्व वाहतूक पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आज बुधवारपासून(दि. २६ जून) हा घाट बंद करण्यात आला आहे. २६ जून ते ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत हा घाट बंद राहणार आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी याबाबत आदेश काढले आहेत.
आठवड्यापूर्वी वरंधा घाटातील वाघजाई मंदिराजवळ दरड कोसळल्याने घाटातील संरक्षक कठडा तुटून रस्ता खचल्याची घटना घडली होती. पावसाळ्यात या घाटामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन अनेकवेळा अचानक दरडी कोसळणे, झाडे पडणे, रस्ता खचणे, माती वाहून जाणे अशा स्वरुपाच्या घटना घडतात. या पार्श्वभूमीवर संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी आणि त्या अनुषंगाने आवश्यक उपाय योजना करण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. तसेच हवामान खात्याचा रेड आणि ऑरेंज अलर्ट असताना हलक्या वाहनांसह घाटातील सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली आहे.
कोणत्या पर्यायी मार्गाचा वापर करावा?
पुण्यावरुन कोकणात जाण्यासाठी वरंधा घाट हा शॉर्टकट मार्ग आहे. परंतु आता पर्यायी मार्ग वाहनधारकांना वापरावा लागणार आहे. वाहनधारकांनी पुण्याकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-माणगाव-निजामपूर रोड-ताम्हाणी घाट-मुळशी पिरंगुट पुणे आणि पोलादपूर-आंबेनळी घाट-वाई मार्गे पुणे असा मार्ग वापरावा. तसेच कोल्हापूरकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-पोलादपूर-खेड-चिपळुण-पाटण-कराड- कोल्हापूर, असा मार्ग वापरावा.