मातीची वाहतूक करण्यासाठी पाच हजारांची लाच घेताना बावधन वाहतुक विभागातील पोलीस नाईक रंगेहाथ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
पुणे : उत्खनन केलेल्या मातीची वाहतूक करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पोलिस अंमलदारास रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी(२७ जून) बावधन वाहतूक विभाग येथे ही कारवाई केली. समाधान वालचंद लोखंडे(वय ३९ वर्ष, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे, वर्ग-३), असे ताब्यात घेतलेल्या पोलिस अंमलदाराचे नाव आहे. याप्रकरणी एका ३२ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पोलीस नाईक समाधान लोखंडे हे बावधन वाहतूक विभाग कार्यरत आहेत. दरम्यान, उत्खननातील माती वाहून नेणाऱ्या पाच वाहनांवर कारवाई न करण्यासाठी त्यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती दिली.
तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता समाधान लोखंडे यांनी पैसे मगितल्याचे समोर आले. त्यानुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बावधन चौकी समोर सापळा रचून लोखंडे यांनी पाच हजार रुपये स्वीकारताना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर हिंजवडी पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कामगिरी केली असून पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक विरनाथ माने करीत आहेत.