डोणजेतील बांधकाम व्यावसायिक विठ्ठल पोळेकर खून प्रकरणातील मुख्य आरोपीच्या भोर तालुक्यातील सारोळे येथे आवळल्या मुसक्या; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
पुणे : दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करून बांधकाम व्यावसायिक विठ्ठल पोळेकर यांचा खून करणाऱ्या मुख्य फरारी आरोपीच्या मुसक्या आज बुधवारी (दि. ८ जानेवारी) स्थानिक गुन्हे ग्रामीण शाखेच्या पोलिसांनी सारोळे (ता. भोर) येथे आवळल्या आहेत. योगेश ऊर्फ बाबु किसन भामे (वय ३२ वर्ष, रा. डोणजे, ग्रामपंचायत जवळ, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. आरोपी योगेश भामे याच्यावर आत्ता पर्यंत विविध पोलीस ठाण्यात ९ गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, फसवणूक, अतिक्रमण, बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल आहेत. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने आरोपीला रिमांड पोलीस कस्टडी मंजूर केली आहे.
या अगोदर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी शुभम पोपट सोनवणे (वय २४ वर्ष, रा. चिंचोली गुरव, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर), मिलिंद देविदास थोरात (वय २४ वर्ष ,रा. बेळगाव, कर्जत, जि. अहिल्यानगर), यांना ताब्यात घेतले असून ते सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण ?
स्थानिक गुन्हे ग्रामीण शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड पायथ्याजवळील डोणजे गावात विठ्ठल सखाराम पोळेकर (वय ७० वर्ष) राहायला होते. १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ते नेहमीप्रमाणे सिंहगड पायथा परिसरात फिरायला गेले होते. ते घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोळेकर याचे अपहरण करुन खून करण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले होते.
विठ्ठल पोळेकर यांनी पायगुडे वाडी ते गोळेवाडी रस्त्याचे शासकीय कामाचा ठेका घेतला होता. त्या कामात कोणताही अडथळा करू नये म्हणून योगेश ऊर्फ बाबु किसन भामे याने विठ्ठल पोळेकर यांचे कडे खंडणी म्हणून एक जॅग्वार कंपनीची चारचाकी कार मागितली होती. त्याची पुर्तता न केल्यास विठ्ठल पोळेकर व त्यांचा मुलगा प्रशांत पोळेकर यांचा खुन करण्याची धमकी दिली होती.
डोणजे गावातील योगेश ऊर्फ बाबु किसन भामे हा त्याचा मोबाईल बंद करून गावात नसल्याने त्यानेच विठ्ठल पोळेकर यांचे अपहरण केल्याची खात्री झाल्याने योगेश भामे आणि त्याचे साथीदार यांच्यावर हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.
सदरचा गुन्हा हा निवडणुक आचारसंहिता कालावधीत घडला होता. स्थानिक गुन्हे शाखा व हवेली पोलीस पथकांनी समांतर तपास करत असताना सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी गुन्ह्यात वापरलेली कार ही डोणजे गावातील गणेश चोरमले यांची असल्याची आणि ती कार दोन दिवसापासून योगेश भामे हा वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
तसेच योगेश भामे आणि त्याचे साथीदार शुभम सोनवणे व मिलींद थोरात यांचा सहभाग गुन्ह्यात असल्याचे निष्पन्न झाले होते. दरम्यान, हे तिघे आरोपी नाशिक येथून रेल्वेने गोरखपूर बाजूकडे जात होते. त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जबलपूर येथून रेल्वे पोलीसांच्या मदतीने त्या दोघांना ताब्यात घेतले होते.
दरम्यान, गुन्ह्यातील मुख्य आरोपी योगेश भामे हा फरार होता. त्याचे शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके तैनात करण्यात आली होती. आरोपीचा शोध घेत असताना आरोपी योगेश भामे हा सातारा ते पुणे रोडवरील सारोळे(ता. भोर) पुलाजवळील परिसरात असल्याची बातमी पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे व हवेली पोलिसांच्या पथकाने त्या परिसरात सापळा लावून आरोपी योगेश ऊर्फ बाबु किसन भामेला ताब्यात घेतले. पुढील तपास हवेली पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात येत आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनीलकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, हवेली पो स्टे चे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, स्था.गु.शाचे सपोनि कुलदीप संकपाळ, दत्ताजीराव मोहिते, सपोनि सागर पवार, पोसई अभिजीत सावंत, पोसई संजय सुतनासे, अंमलदार रामदास बाबर, राजू मोमीण, अतुल डेरे, अभिजीत एकशिंगे, मंगेश थिगळे, अमोल शेडगे, अजित भुजबळ, मंगेश भगत, महेश बनकर, हनुमंत पासलकर, तुषार भोईटे, सागर नामदास, वैभव सावंत, विभीषण सस्तुरे, हवेली पो स्टे कडील अंमलदार संतोष भापकर, दिपक गायकवाड, संतोष तोडकर, गणेश धनवे, महेंद्र चौधरी, सचिन गुंड, अजय पाटसकर, दिलीप आंबेकर यांनी केली आहे. तसेच पुढील तपास हवेली पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात येत आहे.