उत्रौलीत सुप्रिया सुळेंचा फ्लेक्स फाडला! भोर तालुक्यातील राजकीय वातावरण तापले
भोर : उञौली(ता.भोर) येथील गावात लोकसभा निवडणुक चिन्ह आणि खा.सुप्रिया सुळे यांचा फोटो असलेला फ्लेक्स फाडण्यात आला आहे. यामुळे राजकीय वातावरण ढवळले असुन माहिती पसरताच फाडलेला फ्लेक्स काढण्यात आला आहे.
उत्रौली(ता.भोर) गावात महाविकास आघाडीच्या उमेदवार खा. सुप्रिया सुळे यांचा तुतारी चिन्हासह असलेला फ्लेक्स ब्लेड मारून फाडण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे जिथे आज सुनेत्रा पवार यांचा कार्यक्रम आहे, त्याच ठिकाणचा फ्लेक्स फाडला गेला आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांच्या चेहऱ्याचा भागावर फुली मारून फ्लेक्स फडण्यात आला आहे. सदरची घटना कळताच तात्काळ फाडलेला फ्लेक्स काढण्यात आला आहे. बारामती लोकसभा मतदार संघात सध्या खा. सुप्रिया सुळे विरुध्द सुनेञा पवार नणंद भावजय अशी लढत होईल असे चिन्ह आहे. यामुळे सध्या वातावरण चांगलेच तापले असुन उञौली गावात खा.सुळे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने लावलेल्या फ्लेक्सवरील खा.सुळे व उध्दव ठाकरे यांचे फोटो ब्लेडसारख्या धार धार शस्त्राने फाडले आहेत.
यामुळे शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. तसेच निवडणुक आचारसंहिता जाहिर होण्याआगोदरच राजकीय वातावरण चांगलेच तापले असल्याचे पाहायला मिळत आहे.