पानशेत-वेल्हे घाट रस्त्यावरील कादवे खिंडीत बेपत्ता तन्मयचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला
वेल्हा : खडकवासला-कोल्हेवाडी येथील बेपत्ता युवकाचा मृतदेह पानशेतजवळील कादवे खिंडीत जळालेल्या अवस्थेत सापडला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. तन्मय किरण तांबडे (वय २४, रा. सुशीला पार्क, कोल्हेवाडी, खडकवासला) असे मृत युवकाचे नाव आहे. तो मुळचा कोल्हापूर येथील राहणारा आहे. तन्मय याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मृतदेहाच्या शवविच्छेदनाच्या अहवाल मिळाल्यानंतर मृत्युचे कारण समजू शकेल असे वेल्हे पोलिसांनी सांगितले.
शनिवारी (दि. ९ मार्च ) तन्मय हा कामावर जातो असे सांगून घरातून गेला. त्यानंतर तो परत घरी आला नाही. नातेवाईकांनी हवेली पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या निरीक्षणाखाली पोलिस हवालदार विलास प्रधान तन्मय याचा शोध घेत होते. सोमवारी (दि. ११ मार्च) तन्मय याची दुचाकी गाडी पानशेत-वेल्हे घाट रस्त्यावरील दुर्गम कादवे खिंडीत सापडली. पोलिस अंमलदार विलास प्रधान, आपत्ती व्यवस्थापनचे तानाजी भोसले, गणेश सपकाळ, संजय चोरघे, संदीप सोलस्कर, वैभव निकाळजे, गणेश पांढरे, राहुल पवळे आदींनी पुन्हा शोध मोहीम सुरू केली असता जळालेल्या अवस्थेत तन्मय याचा मृतदेह सापडला.