भाटघर धरण परिसरातील ब्राम्हणघर येथील मोटर केबल चोरणाऱ्या चोरट्यास शेतकऱ्यांनी रंगेहाथ पकडुन दिले पोलिसांच्या ताब्यात
कापूरहोळ : भोर तालुक्यातील भाटघर धरण परिसरातील ब्राम्हणघर हद्दीतील शेतकऱ्यांच्या मोटारीसाठी लावलेल्या केबल चोरून नेत असताना स्थानिक शेतकऱ्यांनी सतर्कता दाखवत चोराला रंगेहाथ पकडून राजगड पोलिसांच्या ताब्यात दिले. अजित सदाशिव धुमाळ(रा. हर्णस, ता. भोर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत तेजस सुरेश गद्रे(वय २६ वर्षे, रा. ब्राम्हणघर, ता. भोर) यांनी फिर्याद दिली आहे.
राजगड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तेजस गद्रे व इतर शेतकरी यांची भाटघर धरण परिसरातील ब्राम्हणघर(ता.भोर) हद्दीत शेतजमीन आहे. पिकाला पाणी देण्यासाठी हे शेतकरी मोटरला केबल जोडून भाटघर धरणातील पाणी मोटारच्या सहाय्याने शेतीला देतात. रविवारी(दि. १७ मार्च) सायंकाळी आरोपी अजित धुमाळ हा ब्राम्हणघर हद्दीतील शेतकऱ्यांच्या ७७०० रुपये किंमतीच्या केबल चोरी करून पळून जात असताना, गद्रे व इतर शेतकऱ्यांनी सतर्कता दाखवत त्यास रंगेहाथ पकडून राजगड पोलिसांच्या ताब्यात दिले. राजगड पोलीसांनी मुद्देमाल ताब्यात घेतला असून सदर आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीस काही दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार राजेंद्र चव्हाण करीत आहेत.