सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी २५ हजारांची लाच स्वीकारताना तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
वडगाव : शेतीच्या गटाची फोड केल्याची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी ५० हजारांची लाच मागितली. त्यातील पहिला हप्ता म्हणून २५ हजारांची लाच स्वीकारताना करुज (ता. मावळ) येथील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सोमवारी(दि. १८ मार्च) रंगेहात पकडले. सखाराम कुशाबा दगडे (वय ५२, सजा करुज, वडगाव, ता. मावळ, जि. पुणे (वर्ग-३) असे संबंधित तलाठ्याचे नाव आहे. या प्रकरणी एका ४० वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या शेतीच्या गटाची फोड केल्याची सातबारा उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी सखाराम दगडे यांनी ५० हजार रुपयांची लाच मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
मिळालेल्या तक्रारीची पडताळणी केली असता, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सखाराम दगडे यांनी तक्रारदार यांच्याकडे सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती व तक्रारदार यांच्याकडून पहिला हप्ता म्हणून सखाराम दगडे याला २५ हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि.१८ मार्च) रंगेहात पकडले.
दरम्यान, याप्रकरणी सखाराम दगडे याच्यावर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची करण्याची प्रक्रिया सुरु आहे. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक विरनाथ माने करत आहेत.