भोर शहरात अवैध्य गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक; २७ हजारांचा गुटखा जप्त
भोर : भोर शहरात घराच्या छतावर अवैध्यरीत्या गुटखा विक्री करणाऱ्यास शुक्रवारी (दि.२२ मार्च) भोर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडील २७ हजार ८५ रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. राहुल बाळू कुमकर (वय २४ वर्ष, रा. भेलकेआळी, भोर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या भोर शहरात पोलिस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुटख्याची अवैधरीत्या विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरू आहे. यादरम्यान पोलीस निरीक्षक पवार यांना गोपनीय माहिती मिळाली की, भोर शहरातील भेलकेआळी येथे एका घरावरील छतावर अवैध्य गुटखा विक्री केला जात आहे. त्यांनी लगेच पोलिस उपनिरीक्षक शीला खोत यांचे पथक सदर ठिकाणी पाठवले. या पथकाने तिथे छापा टाकत घराच्या छतावर ९ बॉक्समध्ये विक्रीसाठी चोरून आणलेला गुटखा जप्त करत राहुल कुमकर यास अटक केली. या नऊ बॉक्समधून आर एम डी पान मसाला, एम सेंटेड तंबाखू गोल्ड, केशर युक्त विमल पान मसाला, व्ही एन तंबाखू आदी वस्तू आढळून आल्या. सदरची कारवाई पोलिस उपनिरीक्षक शीला खोत, पोलिस हवालदार विकास लगस, पोलिस नाईक अतुल मोरे व दत्तात्रेय खेंगरे यांनी केली.