सुप्रिया सुळेंच्या मोहरी बु. येथील महाविकास आघाडीच्या सभेला भोरच्या जनतेने फिरवली पाठ; फक्त २०० ते २२५ लोकांची उपस्थिती
भोर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर बारामती मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी लढत पाहायला मिळणार असल्याचे चित्र आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी विजय शिवतारे यांनी केलेल्या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे आता प्रत्येक पदाधिकाऱ्याला आणि कार्यकर्त्याला राजकीय महत्व प्राप्त झाल्याचे दिसून आले आहे. सर्वांनीच प्रचारदौरा आणि प्रचार सभेचा तडाखा लावला आहे.
या दरम्यान गुरुवारी भोर तालुक्यातील विविध ठिकाणी सुप्रिया सुळेंच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या सभा घेण्यात आल्या. त्यातील श्री सिद्धाश्रम मठ, मोहरी बुद्रुक(ता.भोर) येथील गुरुवारची(दि. २१ मार्च) सभा मात्र चर्चेचा विषय ठरली. सायंकाळी ही सभा ६ वाजल्या नंतर सुरू झाली. विशेष म्हणजे या सभेला सुप्रिया सुळे आणि आमदार संग्राम थोपटे उपस्थित असूनही सभेला २०० ते २२५ एवढे लोकच उपस्थित होते. त्यामध्ये पण सुप्रिया सुळेंच्या बरोबर असणाऱ्या ताफ्यातील लोक किती आणि परिसरातील मतदार जनता किती? हा प्रश्न तालुक्यात रंगलेल्या चर्चेत पहायला मिळाला.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने सुप्रिया सुळेंना निवडून आणण्यासाठी मोठे उद्दिष्ट निश्चित केले आहे. मात्र त्याला काल चक्क आघाडीच्या कार्यकर्त्यांनीच अपशकून केला. या सभेला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व भोर तालुक्यातील जनतेने सपशेल पाठ फिरवल्याचे दिसून आले. त्यामुळे भोर तालुक्यातील जनतेच्या मनात नेमके चाललंय तरी काय? अशी चर्चा भोर तालुक्यात सर्वत्र सुरू आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने रणनीतीचा भाग म्हणून या सभेकडे पाहिले जात होते. मात्र जेवढा गाजावाजा आणि संघटनात्मक स्तरावर तयारीची चर्चा होती, तेवढा प्रतिसाद या सभेला मिळाला नाही, अशी चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आहे. बहुतांश कार्यकर्त्यांनी व भोर तालुक्यातील जनतेने या सभेला पाठ फिरवल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. त्याची या सभेत विशेष चर्चा घडली. “मेळावा उशीरा सुरु झाल्याने लोक कमी आले आहेत”, अशी सारवासारव या वेळी बोलताना आमदार संग्राम थोपटेंनी केली. तसेच सभेचे व्यवस्थित नियोजन न झाल्यामुळे सभेला लोकांची गर्दी जमली नाही, याला त्यांनी दुजोरा दिला.
परंतु या सभेची गर्दी पाहता, भोर तालुक्यातील सुप्रिया सुळेंचे वर्चस्व तर कमी झाले नाही ना? सुप्रिया सुळेंसाठी ही धोक्याची घंटा तर नाही ना? जनतेचा कल सुप्रिया सुळेंच्या विरोधात जाण्याची ही सुरुवात तर नाही ना? या प्रश्नांची चर्चा मात्र भोर तालुक्यात या सभेनिमित्त पाहायला मिळाली.