सासवड पोलीस ‘ॲक्शन मोडवर’; लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पथसंचलन
सासवड : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुरंदर तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सासवड पोलिसांनी कंबर कसली आहे. निवडणूक काळात राजकीय कोणतेही वाद उत्पन्न होवू नयेत, नागरिक आणि पोलीस यांच्यातील दुरावा कमी व्हावेत. अवैद्य व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींमध्ये कायद्याबाबत जरब निर्माण व्हावी, जातीय सलोखा राखावा तसेच सामान्य नागरिकांमध्ये कोणतीही भीती न राहता शांततेचे वातावरण व्हावे यासाठी सासवड पोलिसांच्या वतीने नुकतेच पथसंचलन करण्यात आले आहे. त्या सोबतच कोणीही कायदा हातात घेतल्यास गय करणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी लोकसभा निवडणुकीच्या कालावधी दरम्यान पुरंदर मधील विविध गावच्या ग्रामदेवतेच्या यात्रा तसेच विविध धार्मिक उत्सव यांचा एकाच कालावधीत येत आहे. या सर्वबाबी विचारात घेता पोलिसांना मोठी कसरत करावी लागणार आहे. निवडणुकी दरम्यान राजकीय सभा, मेळावे यांना बंदोबस्त पुरविणे विविध गावांच्या वार्षिक यात्रा, जत्रा शांततेत पार पाडणे यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी बारामती लोकसभा मतदार संघासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. या संपूर्ण कालावधीत पोलिसांना कडक बंदोबस्त ठेवावा लागणार आहे. तर पुरंदर तालुक्यात याच दरम्यान विविध उत्सव, सण समारंभ येत असून, २५ मार्च होळी, २६ मार्च धुलीवंदन, २७ मार्च संत तुकाराम महाराज बीज, ११ एप्रिल रमजान ईद, १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, १७ एप्रिल रोजी श्रीराम नवमी, २१ एप्रिल भगवान महावीर जयंती, २३ एप्रिल ते ८ मे या कालावधीत पुरंदर मधील विविध गावांच्या ग्राम देवतेच्या वार्षिक यात्रांचा हंगाम, १ मे महाराष्ट्र दिन, १४ मे छत्रपती संभाजी महाराज जयंती सोहळा, २३ मे बुद्ध पौर्णिमा. यानंतर ४ जून निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच क्षेत्र पंढरपूर येथील आषाढी यात्रेची तयारी सुरु करावी लागणार आहे. या निमित्त शासकीय अधिकारी आणि राजकीय नेत्यांचे दौरे, नियोजन आणि आढावा बैठकांचा धडाका सुरु होईल. २८ जून रोजी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे क्षेत्र देहू येथून प्रस्थान सुरु होईल तसेच २९ जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे क्षेत्र आळंदी वरून प्रस्थान सुरु होईल. २ जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे दोन दिवसांच्या मुक्कामासाठी सासवड मध्ये आगमन होईल. इत्यादी कार्यक्रमांचे वेळापत्रक पाहता पोलिसांना अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीवावर बंदोबस्ताचा ताण घेतानाच त्यांच्या आरोग्याकडे पाहायला वेळ मिळणार का ?हाच मोठा प्रश्न आहे.
पुरंदर तालुक्यात धार्मिक स्थळांची संख्या मोठी असून, वर्षभर विविध कार्यक्रम असल्याने तेथे नियमित बंदोबस्त द्यावा लागतो. यावेळी निवडणुकी दरम्यान वार्षिक यात्रा आणि विविध सण, उत्सव असल्याने पोलिसांवर ताण येणार असला आपली भूमिका सक्षमपणे पार पाडण्यासाठी आमचे कर्मचारी तत्पर आहेत. पुरंदर तालुक्यातील नागरिकांनी कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत असे वर्तन ठेवावे. अफवा पसरविणाऱ्या लोकांवर कोणीही विश्वास ठेवू नयेत. बेकायदेशीर धंदे सुरु करणे अथवा कायदा हातात घेवून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केल्यास त्यास कायद्याच्या भाषेतच उत्तर दिले जाईल.
-ऋषीकेश अधिकारी, पोलीस निरीक्षक, सासवड