लाच स्विकारताना सहाय्यक निबंधक कार्यालयातील अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात
बारामती : जमिनी संदर्भात कोर्टात दाखल असलेल्या दाव्याची स्टे ऑर्डर जमा करुन घेण्यासाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी करुन साडे चार हजार रुपये लाच स्वीकारताना सहाय्यक निबंधक संस्था, बारामती कार्यालयातील सहकारी अधिकाऱ्याला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी (दि. १९ जुलै) सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, बारामती यांच्या दूसऱ्या मजल्यावरील प्रशासकीय भवन येथे करण्यात आली.
अनिलकुमार संभाजी महारनवर(वय ४६ वर्ष) असे लाच घेताना पकडलेल्या सहकारी अधिकाऱ्याचे नाव आहे. याबाबत 35 वर्षीय व्यक्तीने पुणे एसीबी कार्यालयात तक्रार दिली आहे. तक्रारदार यांच्या जामिनी संदर्भात विभागीय सह निबंधक सहकारी संस्था पुणे यांच्या कोर्टात दावा दाखल केला आहे. त्यामध्ये त्यांनी स्टे ऑर्डर दिली आहे. या स्टे ऑर्डरची कॉपी जमा करण्यासाठी तक्रारदार हे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, बारामती यांच्या कार्यालयात गेले होते. त्यावेळी सहकारी अधिकारी महारनवर यांची भेट घेतली. त्यावेळी महारनवर याने काम करण्यासाठी व मदत करण्यासाठी पाच हजार रूपये लाचेची मागणी केले. याबाबत तक्रारदार यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली.
तक्रारदार यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने पुणे एसीबीच्या पथकाने शुक्रवारी पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. पडताळणी दरम्यान अनिलकुमार महारनवर याने तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष पाच हजाराची लाच मागणी करुन तडजोडी अंती साडे चार हजार रुपये मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तक्रारदार यांच्याकडून लाच स्वीकारताना महारनवर त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. अनिलकुमार महारनवर यांच्यावर बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, पोलीस उप अधीक्षक नितिन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर, महिला पोलीस शिपाई कोमल शेटे, पोलीस कॉन्स्टेबल तावरे, चालक श्रेणी पोलीस उप निरिक्षक जाधव यांच्या पथकाने केली.