विसगाव खोऱ्यातील शिवकालीन जानुबाई माता मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन…

निनाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : भोर तालुक्यातील विसगाव खोऱ्यातील आंबाडे येथील शिवकालीन जानुबाई मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून उत्सवाची तयारी पूर्ण झाल्याचे श्री जानुबाई देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त प्रदीप खोपडे यांनी सांगितले.भोर मांढरदेवी मार्गावरील अंबाडखिंड घाटाच्या पायथ्याशी दक्षिणेस सह्याद्रीच्या डोंगर रांगेच्या कुशीत वीसगाव खोऱ्याचे श्रद्धास्थान, अंबाडे गावची ग्रामदेवता जानूबाई मातेचे मंदिर आहे. शिवकालादरम्यानचे है ठिकाण असल्याने जानूबाई माता मंदिरास ऐतिहासिक महत्त्व आहे. सभोवताली हिरवीगार भातशेती, प्राचीन महाकाय वटवृक्षाची घनदाट सावली, समोर सह्याद्रीची घनदाट जाते, हिरवेगार जंगल असलेली डोंगर रांग असे निसर्गाचे कोंदण लाभलेल्या शिवकालीन जानूबाई मातेचा मंदिर परिसर अत्यंत रमणीय असा आहे. खोपडे घराण्याचे केदारजी खोपडे यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात शिकेकरी वतनी सरदारकी मिळाली होती. त्यावरून त्यावेळी मूळ अंबाडे गावाच्या मध्यवर्ती भागात हे मंदिर बांधले होते. जानूबाई मातेचे मंदिर व मूर्तीची माता ही खंडोबाची बहीण आहे.जानुबाई ही माता देवीची उत्पत्ती आहे. अंबाडे येथील जानूबाई मातेची मूर्ती प्राचीन म्हणजे साडेतीनशे वर्षांहून अधिक काळ जुनी असल्याचे शिवकालीन कालखंडावरून मानले जाते. जानूबाई मातेची मूर्ती अखंड गंडकी शिळेत कोरलेली आहे. मूर्तीची तीन फूट उंची असून स्तब्धावेशात अशी उभी आहे. चतुर्भुज मूर्तीच्या हातात त्रिशूल, गदा, दंड ही आयुधे असून एका हातात वध केलेल्या राक्षसाचे शरीर आहे.नवरात्रोत्सव काळात ग्रामस्थ मंडळ व श्री जानुबाई माता देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अत्यंत भावपूर्ण वातावरणात घटस्थापना झाल्यानंतर गणेश पूजन, पुण्याहवचन, ब्रह्म पूजन, मातृका पूजन, प्रधान देवता स्थापना, सप्तशती पाठ, स्थापित देवता पूजन, फलाचन, हिरण्य अर्चन आदी धार्मिक कार्यक्रम होतात, तसेच ललिता पंचमीच्या दिवशी कुंकुमार्चन, गृहयज्ञ तसेच नऊ कन्या पूजन करून त्यांना वस्त्रदान केले जाते. आश्विन शुद्ध नवमीला उत्तरांग पूजनाने घटोत्थापना (घट) उठविणे) केली जाते. त्या दिवशी पूर्णाहुती यज्ञ केला जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आश्विन शुद्ध दशमीला, दसयाच्या दिवशी ग्रामदेवतेची पालखीतून वाजत गाजत मिरवणूक काढून सीमोलंघन केले जाते.नवरात्रोत्सवाचा शुभारंभ रविवारी (ता.१५) रोजी सकाळी ७ वा. जानूबाई मातेस महाभिषेक करून त्यानंतर विधिवत घटस्थापना करण्यात आली. त्यानिमित्ताने मंदिरात गणेश पूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, प्रधान देवता स्थापना, दैनंदिन सप्तशती आदी धार्मिक विधी झाले. सोमवार (ता. १६) ते बुधवार (ता. १८) या दिवशी मंदिरात रोज स्थापित देवता पूजन रोज संध्याकाळी परिसरातील भजनी मंडळांच्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. गुरुवार (ता. १९) रोजी ललिता पंचमीच्या निमित्ताने नऊ कन्यांचे विधिवत पूजन तसेच त्यांना वस्त्रदान करण्याचा कार्यक्रम होणार आहे. तसेच त्यादिवशी कुंकुमार्चन, अग्नीस्थापना, गृहयज्ञ आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. शुक्रवार ते रविवार (ता. २० ते २२) या कालावधीत नैमित्तिक धार्मिक कार्यक्रम होतील. सोमवारी (ता. २३) अश्विन शुद्ध नवमीच्या दिवशी उत्तरांग पूजन, पूर्णाहूती, पारणे व महाआरती आदी धार्मिक कार्यक्रम होऊन घटस्थापनेचा विधिवत कार्यक्रम होणार आहे. मंगळवार (ता.२४ रोजी सायंकाळी जानूबाई देवीच्या पालखी सोहळ्याची ग्रामप्रदक्षणा व सीमोलंघनकार्यक्रम होणार आहे. अशी माहिती श्री जानुबाई देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त प्रदीप खोपडे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page