उसने घेतलेल्या पैशांसाठी अल्पवयीन मुलीला लावले वेश्याव्यवसायास; महिलेसह दोघांविरुध्द गुन्हा
कात्रज : वडिलांच्या आजारपणासाठी उसने घेतलेले ३० हजार रुपये परत करू न शकल्याने १७ वर्षीय मुलीला लॉजमध्ये डांबून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एका महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पीडित अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे. पूनम आकाश माने (वय २२ वर्ष, रा. कात्रज गावठाण) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. तिचा पती आकाश सुरेश माने (वय २४ वर्ष) हा पसार झाला आहे. हा प्रकार ऑक्टोबर २०२३ ते १४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेची अल्पवयीन मुलीशी ओळख होती. तिने वडिलांच्या उपचारासाठी आरोपी महिलेकडून ३० हजार रुपये उसने घेतले होते. परंतु ती पैसे परत करू शकली नाही. त्यामुळे आरोपींनी तिच्याकडे पैशांचा तगादा लावला होता. पैसे वसूल करण्यासाठी महिलेने मुलीला धनकवडी परिसरात एका लॉजमधील खोलीत दहा ते पंधरा दिवस डांबून ठेवले. आरोपी महिलेचा पती आकाशने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर आरोपींनी तिला कात्रज आणि धनकवडी परिसरात लॉजवर नेऊन तिच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेतला. ग्राहकांकडून येणारे पैसे आरोपींनी घेवून आर्थिक लाभ घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी तीन लॉजमधील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले आहे.
पीडित मुलीला सुधारगृहात ठेवण्यात आले असून, महिला व बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात येणार आहे. आरोपी आकाश माने चालक असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. संबंधित लॉजच्या व्यवस्थापक आणि कामगारांना ताब्यात घेण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी. एस. पाटील यांनी सांगितले.