पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना वेल्ह्यातील लाचखोर ग्रामसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
पुणे : घराच्या उताऱ्यात दुरुस्ती करुन देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना वरसगावच्या ग्रामसेवकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. विठ्ठल वामन घाडगे (वय ४४, रा. वरसगाव, वेल्हा) असे या ग्रामसेवकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचे वरसगाव येथे वडिलोपार्जित घर आहे. या मिळकतीच्या क्षेत्राच्या नोंदीत दुरुस्त करुन घराच्या ८ उताऱ्यावर तक्रारदार यांचे नाव दुरुस्ती व त्यांच्या आईचे नाव लावण्यासाठी ग्रामपंचायतीत अर्ज केला होता. ग्रामसेवक विठ्ठल घाडगे याने त्यांच्याकडे ५ हजारांची लाच मागितली. त्याची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे काही दिवसांपूर्वी तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची पडताळणी बुधवारी करण्यात आली. त्यानुसार कर्वेनगर येथील मातोश्री वृद्धाश्रमाचे जवळ ग्रामसेवक घाडगे याने तक्रारदार यांस बोलावले. त्याचवेळेस तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने घाडगे यांस रंगेहाथ पकडले. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक विद्युलता चव्हाण तपास करीत आहेत.