येणाऱ्या निवडणुकीत पवार आडनावाला मत द्या; अजित पवारांचे बारामतीकरांना आवाहन
बारामती : आज मंगळवारी(दि. ९ एप्रिल) गुढीपाडव्याचा सण असल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या मूळगावी म्हणजेच बारामतीतील काटेवाडी येथे उपस्थित होते. काटेवाडीतील निवासस्थानी विधीवत पूजा करुन गुढी उभारण्यात आली. यावेळी अजित पवार, सुनेत्रा पवार यांच्यासह पार्थ पवार आणि जय पवार हेही उपस्थित होते. गुढीपाडवा साजरा केल्यानंतर अजित पवार मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. बारामतीकरांशी संवाद साधताना त्यांनी मतदारांना आवाहन केलं आहे. यावेळी बोलताना सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवरही त्यांनी भाष्य केलं आहे. लोकसभा निवडणूक अन् प्रचारावर अजित पवार बोलताना म्हणाले की, १८ तारखेला पुण्यात बारामती मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज भरणार आहेत. याचवेळी शिरूर, मावळ, बारामती तीन मतदारसंघाचे एकत्र अर्ज भरणार आहोत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्ज भरण्यासाठी येणार आहेत. तसेच बारामतीमधील पदाधिकाऱ्यांना अर्ज भरण्यासाठी यायचं आहे, असं आवाहनही अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना यावेळी केले.
महायुतीचा उमेदवार म्हणून सुनेत्रा अजित पवार यांचे नाव जाहीर झाले आहे. आपण सगळेजण पहिल्यापासून पवारांच्या पाठीमागे उभं राहिले आहात. येणाऱ्या निवडणुकीत पवार आडनावाला मत द्या. पहिलं साहेब, नंतर पुतण्या आणि नंतर लेक आणि आता सुनेला मत द्या. म्हणजे कुणीही नाराज होणार नाही, असं आवाहन अजित पवार यांनी मतदारांना केलं आहे.
सर्वांचं व्हिजन होते म्हणून बारामतीचा विकास झाला. १० वर्षात मोदींनी कधीही सुट्टी घेतली नाही. जगात तिसऱ्या क्रमांकावर अर्थव्यवस्था आणण्याचे मोदींचे प्रयत्न केले आहेत. रस्त्यांची सर्व कामे चालली आहेत. त्याला केंद्राचा पैसा वापरला जात आहे. राजकारणात कुणीही कुणाचे शत्रू नसते आणि मित्र देखील नसते. मोदींनी सांगितले आहे, मी जेव्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान होईल त्यावेळेस मी दोन महिन्यात असे निर्णय घेईल की, संपूर्ण देश स्मरणात ठेवेल. मोदी हे सर्व व्हिजन असलेलं नेतृत्व आहे, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.