सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ काढलेल्या गावभेट दौऱ्याकडे वीसगाव खोऱ्यातील जनतेने फिरवली पाठ; मध्यातूनच दौरा करावा लागला रद्द
भोर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर बारामती मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी लढत निश्चित झाली आहे. त्यामुळे आता प्रत्येक पदाधिकाऱ्याला आणि कार्यकर्त्याला राजकीय महत्व प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे. सर्वांनीच गावभेट दौरा आणि प्रचार सभेचा तडाखा लावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील भोर तालुक्यातील असेच काही नेते तालुकाभर दौरे काढत आपले वलय निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र वीसगाव खोऱ्यातील जनतेने हे नेतृत्व अमान्य करत त्यांच्या दौऱ्याकडे सपशेल पाठ फिरवली असल्याचे दिसून आले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ भोर तालुक्यात गावभेट दौरे सुरू आहेत. या दरम्यान बुधवारी(दि. ३ एप्रिल) वीसगाव खोऱ्यातील गावात महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत दौरा आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये गोकवडी/नीलकंठ, आंबाडे, बालवडी, नेरे, वरवडी बु., वरवडी डाय., वरवडी खु., पाले, पळसोशी, धावडी असा नियोजित दौरा होता. ठरल्याप्रमाणे गोकवडी येथून या दौऱ्यास सुरुवात झाली. या गावात नेते मंडळी पोहोचल्या नंतर ग्रामस्थांनी काहीसा प्रतिसाद दिला. त्यानंतर नेते मंडळींनी आपला ताफा आंबाडे गावाकडे वळवला. तिथेही ग्रामस्थांनी तसाच प्रतिसाद दिला. त्यानंतर महायुतीच्या नेते मंडळींनी आपला मोर्चा बालवडी या गावाकडे वळवला, विशेष म्हणजे या गावात नेते मंडळींच्या स्वागतासाठी एकही ग्रामस्थ उपस्थित नव्हता. त्यामुळे महायुतीच्या नेते मंडळींना आपल्या गाड्यांचा ताफा आहे तसा या गावातून वळवावा लागला. यानंतर अपुरे कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या अंदाजा अभावी नेरे, वरवडी बु., वरवडी डाय., वरवडी खु. या चार गावांचा नियोजित दौरा थेट रद्द करत महायुतीच्या नेत्यांनी पाले घाटले. आणि त्यानंतर कार्यकर्ते व ग्रामस्थ दौऱ्यासाठी जुळत नसल्यामुळे अखेर पाले गावात स्नेहभोजन आटपून या दौऱ्याचा शेवट करण्यात आला. नेत्यांनी मात्र या भागातील गावांच्या उरूस, यात्रा असल्यामुळे कार्यकर्ते व ग्रामस्थांनी अनुपस्थिती दाखवल्याची सारवा सारव केली.
परंतु ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी वीसगाव खोऱ्याचा हा दौरा हाती घेतला होता. त्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा वीसगाव खोऱ्यातील दबदबा तर कमी झाला नाही ना? त्या नेत्यांचे नेतृत्व वीसगाव खोऱ्यासहित भोर तालुक्यातील जनतेने अमान्य तर केले नाही ना? या नेत्यांवरचा जनतेचा रोष सुनेत्रा पावरांसाठी आगामी काळात घातक तर ठरणार नाही ना? हे यक्षप्रश्न मात्र या वीसगाव खोऱ्यातील गावभेट दौऱ्या निमित्त भोर तालुक्यातील जनतेने उपस्थित केले असल्याचे पाहायला मिळत आहेत.