नसरापूरच्या सभेत सुप्रिया ताई म्हणाल्या, “कुलदीप तात्या माझा जीव तुमच्या पेक्षा जास्त तुमच्या बायकोवर”; परंतु शिवसैनिक म्हणाला, “ताई तुमचा जीवतर तात्यांपेक्षा जास्त दादांवर”

नसरापूर : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी(दि. १२ एप्रिल) पुणे-सातारा महामार्गावरील गावभेट दौऱ्यातील कापूरहोळ(ता.भोर) येथे झालेल्या मंदिरातील सभेत सुप्रिया सुळेंनी भाषणात विधान केले की, “संग्राम थोपटे आणि त्यांचे पदाधिकारी अधिकारी हे प्रचार सभेत जेवढे सहकार्य करत आहेत. त्यांच्यापेक्षा दहा टक्के जास्त मेहनत विधानसभेला आम्ही करू”, असे विधान करून न कळत सुप्रिया सुळे यांनी संग्राम थोपटे यांची उमेदवारी जाहीर केली. आणि त्यानंतर या विधानाचे पडसाद भोर तालुक्यात महाविकास आघाडीत उमटायला सुरुवात झाली. शिवसेना उ.बा.ठा. गटाचे जिल्हा संघटक कुलदीप कोंडे आणि तालुक्यातील शिवसैनिकांनी स्वाभिमानासाठी आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागेल, असे शनिवारी(दि. १३ एप्रिल) स्पष्ट केले. प्रचाराच्या सुरुवाती पासून सुप्रिया सुळे या आमदार संग्राम थोपटे यांना झुकते माप देत असून आम्हाला कायम दुय्यम स्थान देत असल्याचे वेळोवेळी आमच्या निदर्शनास आल्याची खदखद त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यादरम्यान आज रविवारी(दि. १४ एप्रिल) रोजी महाविकास आघाडीचा मेळावा सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत नसरापूर येथे पार पडला. यावेळी भोर तालुक्यातील शिवसेना उ.बा.ठा. गटाच्या नेत्यांच्या भाषणांमधून नाराजीचा सूर काही लपून राहिला नाही. शिवसेना उ.बा.ठा. तालुकाध्यक्ष माऊली शिंदे बोलताना म्हणाले की, प्रचार कसा करायचा, प्रोटोकॉल कसा पाळायचा हे पहिल्याच दिवशी ठरले होते. परंतु हळूहळू प्रोटोकॉल कोणी पाळत नसल्याचे दिसून आले. महाविकास आघाडीच्या फलकावर फक्त सुप्रिया सुळे आणि आमदार संग्राम थोपटेंचा फोटो दिसू लागला. त्यानंतर सुद्धा व्यवस्थित चाललेल्या प्रचारात कापूरहोळ गावात सुप्रिया सुळे यांनी महाविकास आघाडीत फूट पडेल असे वक्तव्य करून मिठाचा खडा पाडला आणि त्यामुळे वातावरण बिघडल्याचे शिंदे यांनी भाषणातून स्पष्ट केले. परंतु विशेष म्हणजे हे भाषण सुरू असताना या सभेला प्रमुख उपस्थिती असणारे सचिन आहिर यांनी शिंदे यांना भाषण आटोपण्याचा इशारा केला.

Advertisement

त्यानंतर पुढे बोलताना कुलदीप कोंडे बोलले की, पक्षश्रेष्ठींचे आदेश पाळून आम्ही सुप्रिया सुळे यांना विजयी करू, मात्र आमच्यात गैरसमज होतील अशी विधाने करू नयेत, अशी विनंती कुलदीप कोंडे यांनी सुप्रिया सुळे यांना भाषणातून केली. पुढे सचिन आहीर बोलताना म्हणाले की, शिवसेनेला एक एक आमदार सोडून जात असताना, शरद पवारांनी आपल्याला साथ दिली, तसेच शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केले. त्यामुळे सुप्रिया सुळे यांना निवडून आणण्यासाठी आपल्याला सर्वात जास्त प्रयत्न करायचे असल्याचे यावेळी ते बोलले.

त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी केलेल्या भाषणात मात्र या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया न देण्यातच समाधान मानले. सुप्रिया ताई भाषणात म्हणाल्या की, “कुलदीप तात्या माझा जीव तुमच्या पेक्षा जास्त तुमच्या बायकोवर म्हणजे शलाकावर आहे”. परंतु भोर तालुक्यातील शिवसैनिक मात्र “ताई तुमचा जीवतर तात्यांपेक्षा जास्त दादांवर आहे” अशी प्रतिक्रिया देताना पहायला मिळाला. परंतु महाविकास आघाडीच्या या नाराजी नाट्यातून भोर विधानसभेत महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याले चित्र पाहायला मिळत आहे. तसेच येत्या काही दिवसांत भोर विधानसभेत नक्कीच मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा मात्र गावागावात पहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page