महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला शासकीय नोकरी, मुख्यमंत्र्यांची घोषणा
निनाद महाराष्ट्र न्यूज : यंदाचा महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांस द्वितीय श्रेणीतील शासकीय नोकरी देण्याचे आश्वासन देत पाच लाख रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. रविवारी रात्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र केसरी सिंकदर शेख यांचा मुबंईत वर्षा निवासस्थानी सत्कार केला.
मोहोळचा मल्ल सिकंदर शेख याने यंदाचा महाराष्ट्र केसरी किताब जिंकला आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी विशेषतः मोहोळ तालुक्यासाठी हे अभिमानास्पद असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिकंदर शेख याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार रविवारी रात्री वर्षा निवासस्थानी सिकंदर शेख याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सिकंदर शेख याचा सत्कार केला. सिकंदर शेख यास रोख पाच लाख रुपये आर्थिक मदत आणि द्वितीय श्रेणीतील शासकीय नोकरी येत्या १५ दिवसात मिळेल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.