सुप्रिया सुळे, संग्राम थोपटेंना राजगडकरांची साथ
राजगड : किल्ले राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या साखर (ता. राजगड) येथे आज मंगळवारी(दि. १६ एप्रिल) बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारानिमित्त सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी भोर, राजगड, मुळशीचे आमदार संग्राम थोपटेही उपस्थित होते. या सभेसाठी राजगड तालुक्यातील युवक, महिला, ज्येष्ठ मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज राजगड किल्ल्यावर सुखरूप पोहोचल्यानंतर ज्या गावात पहिली साखर वाटली, त्याच साखर गावात सुप्रिया सुळे यावेळी विजयी झाल्यानंतर पहिला गुलाल उधळला जाईल, या भावना येथील ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केल्या.
याप्रसंगी संग्राम थोपटे बोलले की, पवार साहेबांचे बोट धरून अनेकांनी राजकारणात प्रवेश केला राजकारणात अनेक पदे मिळवली. पवार साहेब, सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून विकास निधी आणला गेला. गावागावात विकास झाला आणि आत्ता तेच पंधरा वर्षात काय विकास झाला असा सवाल करत आहेत. याचबरोबर थोपटे यांनी विजय शिवतरे यांच्यावर टीका करत एका रात्रीत त्यांना काय साक्षात्कार झाला त्यांना तलवार म्यान करावी लागली, असे म्हणत ते पुरंदरचे पलटूराम आहेत. असे वक्तव्य केले.
त्यानंतर बोलताना सुप्रिया सुळे बोलल्या की, आमची लढाई वैचारिक असून लोकशाहीमध्ये विरोधक असला पाहिजे नसेल तर ती दडपशाही मानली जाते. आणि ही दडपशाहीची भाषा भाजपच्या माध्यमातून केली जात असून, बारामती मध्ये येऊन शरद पवार यांना संपवण्याची भाषा केली जाते. ही भाषा कोणत्याही सुसंस्कृत पक्षाला शोभत नाही परंतु शरद पवार संपवणे एवढे सोपे नाही अशा दडपशाहीला आम्ही भीक घालत नाही. अशी सडकून टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, माझ्या मतदारसंघांमध्ये बाहेरील जिल्ह्यामधील काही माणसे माझ्याविरुद्ध प्रचारासाठी फिरत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे विरोधकांना त्यांच्या कार्यकर्त्यांवर विश्वास नसल्याने भाडोत्री माणसांकडून प्रचार करण्याची वेळ आली आहे. माझा माझ्या कार्यकर्त्यांवरती पूर्ण विश्वास असून ते निष्ठेने काम करत आहेत.
या कार्यक्रम प्रसंगी मानसिंग धुमाळ, शंकरराव भुरुक, दिनकर धरपाळे, दिनकर सरपाले, अमोल नलावडे, शोभाताई जाधव, संतोष रेणुसे, नानासो राऊत, सीमा राऊत, संदीप नगीने, सुवर्णा राजीवडे, प्रकाश बडे, शिवराज शेंडकर, गणेश जागडे, शैलेंद्र वालगुडे, दीपक दामगुडे, हनुमंत कार्ले, शिवाजी चोरघे, विशाल वालगुडे अजय करंजकर, गोरख भुरुक, रमेश शिंदे, दुर्गा चोरघे, सीमा राऊत, शोभा जाधव, आशा रेणुसे, सुधीर रेणूसे, निलेश पवार, आनंता शेंडकर, गणेश जागडे, आदींसह महाविकास आघाडीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.