पिकअप चालकाला डुलकी लागल्याने रिक्षाला दिलेल्या धडकेत ६ जण जखमी; पुणे-सातारा महामार्गावरील शिंदेवाडी गावच्या हद्दीतील घटना
खेड शिवापूर : पुणे-सातारा महामार्गावरील शिंदेवाडी(ता.भोर) गावच्या हद्दीत भरधाव पिकअपने रिक्षाला धडक देऊन महामार्गावर कडेला उभे असलेल्या दाम्पत्यासहित ६ जणांना जखमी केल्याची घटना रविवारी(दि. २६ मे) रोजी दुपारी घडली. पिकअप चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात घडला असल्याचे प्रथमदर्शीनी सांगितले. याबाबत रिक्षा चालक संभाजी सोपान मोरे(वय ५९ वर्ष, सध्या रा. धनकवडी पुणे, मुळ रा. साळवडे, ता. भोर) यांनी फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून पिकअप चालक तेज सिंह(वय ४९ वर्ष, रा. नेवाळा फाटा, रत्नागीरी) याच्या विरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी(दि. २६ मे) रोजी दुपारी पुणे-सातारा महामार्गावर पुणे बाजूकडून सातारा बाजूला जात असलेल्या महिंद्रा कंपनीच्या पिकअपने(एम.एच. ०८ डब्लु. १९७६) शिंदेवाडी(ता.भोर) गावच्या हद्दीत रिक्षाला(एम.एच. १२ के आर ४१००) धडक देत रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या दाम्पत्यालाही जखमी केले. या अपघातात रिक्षाचालक संभाजी मोरे, त्यांचे साडू बाळासाहेब पडवळ, मेहुणी अनुसया पडवळ तसेच रिक्षामध्ये असलेल्या प्रवासी जुबेदा करीम शेख आणि रस्त्याच्या कडेला उभे असलेले मारूती सोनबा राउत व त्यांची पत्नी सुबद्रा राउत(दोघे रा.विझंर ता. राजगड) हे सर्वजण जखमी झाले असून पिकअप चालक तेज सिंह हा अपघातातील सर्वांच्या दुखापतीस व दोन्ही वाहनांच्या नुकसानीस कारणाभुत असल्याबाबतची फिर्याद रिक्षा चालक मोरे यांनी दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून राजगड पोलिसांनी चालका विरोधात गुन्हा दाखल केला असून सदर घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार सुर्यवंशी करीत आहेत.