कुस्त्यांचा आखाडा पाहण्यासाठी आलेल्या तरुणावर भर चौकात कोयत्याने हल्ला; भोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
भोर : शहरात रामनवमीनिमित्त कुस्त्यांचा आखाडा पाहण्यासाठी आलेल्या केशव धर्मेंद्र शिंदे(वय १८ वर्ष, रा. उत्रौली, ता. भोर) या तरुणावर जुन्या वादाच्या कारणावरून रोहित जाधव(रा. भोलावडे, ता. भोर) व इतर दोन अज्ञात तरुणांनी डोक्यात कोयत्याने वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे. जखमी तरुणास तात्काळ भोर पोलिसांनी खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी(दि. १७ एप्रिल) भोर शहर येथे रामनवमी यात्रेनिमित्त कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते. ते पाहण्यासाठी केशव शिंदे व त्याचे दोन मित्र असे तिघेजण आले होते. तेव्हा जुन्या वादाच्या कारणावरून रोहित जाधव व त्याच्यासोबत असणाऱ्या दोन तरुणांनी सम्राट चौक येथे लोकांच्या गर्दीत अंधारामध्ये रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास केशव शिंदे यांचे डोक्यात कोयत्याने दोन ते तीन वार करून जखमी केले. जखमीवर हरजीवन हॉस्पिटल येथे उपचार चालू असून प्रकृती स्थिर आहे. सदर घटनेबाबत भोर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक आण्णासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल चव्हाण करीत आहेत.