किकवीतील अनधिकृत वीटभट्टीवर तीन वर्षीय चिमुकलीचा निष्पाप बळी
किकवी : पुणे-सातारा महामार्गावर असलेल्या किकवी(ता.भोर) गावच्या हद्दीत असणाऱ्या अनधिकृत वीटभट्टीवर पाणी साठवण्यासाठी बांधलेली निकृष्ट दर्जाची टाकी फुटून ३ वर्षीय निष्पाप चिमुकलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून या दुर्घटनेत एक १३ वर्षीय मुलगी जखमी झाली आहे.
याबाबत राजगड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुणे-सातारा महामार्गावर असलेल्या किकवी(ता.भोर) गावच्या हद्दीतील अग्रवाल डेअरीच्या मागील बाजूस गट नं २१२ मध्ये दत्तात्रय भिलारे यांची वीटभट्टी आहे. विशेष म्हणजे ही वीटभट्टी अनधिकृत आहे. तिथे भिलारे यांनी कामगारांना पाणी वापरण्यासाठी सदर गटात ८ फुट बाय ६ फुट लांबीची पाण्याची टाकी गेल्या एक महीन्या पूर्वी बांधकाम ठेकेदाराकडून बांधून घेतली होती. सोमवारी (दि.१२ फेब्रुवारी) दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास वीटभट्टीवर बांधलेली पाण्याची टाकी फुटुन तिच्या भिंती खाली सापडून कुमारी विद्या पांगु जाधव (वय ३ वर्षे) ही जागीच मयत झाली. तर लक्ष्मी गोविंद वाघमारे (वय १३ वर्षे, दोघीही सध्या रा. किकवी, ता. भोर. मूळ रा. कैलवल, ता. माणगाव, जि. रायगड) ही जखमी
झाली असून उपचारासाठी तिला श्लोक हॉस्पीटल (खेड शिवापुर, ता. हवेली) येथे पाठविण्यात आले. सदर घटनेची खबर ही गणेश दत्तात्रय भिलारे(वय २७ वर्ष, रा. किकवी) यांनी दिली आहे. सदर घटनेचा पुढील तपास राजगड पोलीस करीत आहे.
“सदर वीटभट्टी मालक दत्तात्रय भिलारे हे किकवी गावचे रहिवासी आहेत. ते कोणत्याही प्रकारची महसूल विभागाची परवानगी न घेता अनधिकृत वीटभट्टी चालवत आहेत. सदर मालकाच्या हलगर्जीपणामुळे आणि बांधकाम ठेकेदराच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ही घटना घडली आहे. महसूल विभागाकडून सदर घटनेचा पंचनामा करून वीटभट्टी मालकावर कठोर कारवाई करण्यात येईल.”
– पांडुरंग लहारे(मंडल अधिकारी, किकवी)
कुठलाही परवाना नसताना सुरूअसलेल्या या वीटभट्टीवर महसूल विभागाने आजपर्यंत कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे तालुक्यामध्ये अशा अनधिकृत वीट भट्ट्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.