डॉक्टरांचे उपचार न मिळाल्याने हिर्डोशीत गायीचा मृत्यू; बेजबाबदार पशुवैद्यकीय डॉक्टरांवर कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी
भोर : तालुक्यातील पश्चिमेकडील दुर्गम डोंगरी हिरडस मावळ खोऱ्यातील हिर्डोशी-धामणदेववाडी(ता.भोर) येथील शेतकरी कोंडीबा देवबा गोरे यांची गाय दोन दिवस आजारी पडली होती. शेतकरी गोरे यांनी शिरगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील डॉक्टरांना फोनवरून माहिती देत उपचारासाठी बोलवले. मात्र डॉक्टर उपचारासाठी वेळेत न गेल्याने गाईचा उपचाराविना मृत्यू झाल्याची घटना मागील महिन्यात घडली होती.
शेतकरी कोंडीबा गोरे यांची गाय मागील महिन्यात आजारी पडल्याने दोन दिवस अन्न, पाणी न खाता घरात पडून होती. पांडुरंग गोरे यांनी शिरगावच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील डॉक्टरांना गाय आजारी असल्याची माहिती दिली व उपचारासाठी लवकर या असेही म्हणाले. मात्र डॉक्टरांनी उडवाउडवीचे उत्तर देत मिळेल त्या खाजगी डॉक्टरांकडून गाईला उपचार करून घ्या असे सांगितले. डॉक्टर उपचारासाठी येण्याअगोदरच गाईचा मृत्यू झाला. डॉक्टर गाईच्या आजारावरील उपचारासाठी उपलब्ध झाले असते तर गाई वाचली असती, मात्र उपचाराविना गाईचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्याचे हजारोंचे नुकसान झाले. संबंधित शिरगाव(ता.भोर) येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील बेजबाबदार पशुवैद्यकीय डॉक्टरवर वरिष्ठांनी कारवाई करावी अशी मागणी पांडुरंग गोरे या शेतकऱ्याने केली आहे.