अखेर धोम-बलकवडीचे आवर्तन सुटले; पिण्याचे पाणी तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटणार
भोर : तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव, चाळीसगाव खोऱ्यात पाण्याचे जलस्त्रोत आटल्याने विहिरीं, ओढे-नाल्यांनी तळ गाठला होता. दरम्यान परिसरातील अनेक गावांना पाणीटंचाई तीव्र जाणवू लागली होती. त्यामुळे जनावरांच्या हिरव्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला होता. या पार्श्वभूमीवर तसेच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार धोम-बलकवडी धरणाच्या उजव्या कालव्याला दुसरे आवर्तन १५० क्यूसेक्सने जलसंपदा विभागाने सोडले आहे.
तालुक्याचा दक्षिण पट्टा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतो. मात्र दक्षिण पट्ट्यातील बहुतांशी भाग हा खडकाळ व उताराचा असल्याने पावसाचे पाणी काही दिवसातच वाहून जाते. त्यामुळे दरवर्षी वीसगाव खोऱ्यातील दहा ते पंधरा तर चाळीसगाव खोऱ्यातील बहुतांशी गावांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागतात. यंदा पावसाचे प्रमाणही कमी झाले होते. त्यामुळे ओढे-नाले, विहिरींना पाणी कमी होते. त्यातच यंदा कडक उन्हाळा पडल्याने एप्रिलच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत होते. पाणीटंचाईमुळे जनावरांच्या हिरव्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याने जनावरे जगवायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला होता. दरम्यान धोम-बलकवडी धरणाचे दुसरे आवर्तन सुटल्याने वीसगाव, चाळीसगाव खोऱ्यातील पिण्याच्या पाण्याची तसेच जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. या आवर्तनामुळे शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.