बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजगड पोलीसांचा ‘रूट मार्च’
नसरापूर : बारामती लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, तसेच समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर वचक राहून निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात याकरिता आज शुक्रवारी(दि. २६ एप्रिल) राजगड पोलीस ठाण्याच्या वतीने ‘रूट मार्च’ काढून पोलीस बळाचे मोठे शक्ती प्रदर्शन यावेळी करण्यात आले.
बारामती लोकसभेची निवडणूक ७ मे रोजी जाहीर झाली आहे. दरम्यान राजगड पोलिस ठाण्याच्या वतीने हा ‘रूट मार्च’ राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नसरापूर आणि खेड शिवापूर येथे आयोजित करण्यात आला होता. या परिसरातील महत्वाची, संवेदनशील आणि लोकवस्तीच्या ठिकाणी जनजागृती करुन निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्याचे आवाहन राजगड पोलिसांकडून यावेळी करण्यात आले.