भोरला सामुदायिक विवाह सोहळ्यात २७ विवाह शाही थाटात संपन्न
भोर : अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्ट भोर-राजगड-मुळशी आयोजित सामाजिक उपक्रमांतर्गत सर्वधर्मीय बिगरहुंडा मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यात आज रविवारी(दि. २८ एप्रिल) शाही थाटात २७ विवाह भोर येथील अनंतराव थोपटे महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडले. आजपर्यंत अनंतराव थोपटे महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये १२ वेळा सर्वधर्मीय बिगरहुंडा मोफत विवाह सोहळे पार पडले असून यंदाच्या १३ व्या विवाह सोहळ्यात २७ विवाह संपन्न झाले. यामध्ये ६२५ स्वयंसेवकांनी काम केले. यावेळी तब्बल १० हजार लोकांची भोजनाची व्यवस्था केली होती.
या सोहळ्यासाठी अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्ट भोर-राजगड-मुळशी, राजगड ज्ञानपीठ, राजगड साखर कारखाना, रायरेश्वर डोंगरी विकास परिषद, दत्त दिगंबर वाहतूक संस्था यांचे सहकार्य लाभले. आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विश्वचैतन्य परमपूज्य अण्णा महाराज यांचे उत्तराअधिकारी स्वामी पोपट महाराज यांच्या शुभ आशीर्वादाने हा विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडला. यावेळी आनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा स्वरूपा थोपटे, प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी संध्या सव्वालाखे, पृथ्वीराज थोपटे, शैलेश सोनवणे, विठ्ठल आवाळे, पोपट सुके, रामचंद्र आवारे, गणेश पवार, अमित सागळे, अतुल किंद्रे, संदीप नांगरे, रवींद्र बांदल, मानसिंग धुमाळ आदींसह बहुसंख्य लोक उपस्थित होते.