“आधी शपथ मतदानाची, नंतर साता जन्माची”; खेड शिवापूर येथील विवाह सोहळ्यात वधू-वरांनी पार पाडली राष्ट्रीय जबाबदारी
खेड शिवापूर : सध्या सर्वत्र लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. शासनाच्यावतीनेही मतदानाचा टक्का वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यादरम्यान नक्षत्र मंगल कार्यालय(खेड शिवापूर, ता. हवेली) येथे रविवारी(दि. २८ एप्रिल) एका लग्नसमारंभात मतदानासंदर्भात जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या विवाह प्रसंगी एक अनोखा उपक्रम राबवला गेला. जयराज रामदास निकम(रा. वडगाव डाळ, ता. भोर) आणि अक्षदा नरेश बगाडे(रा. कर्वेनगर वारजे, पुणे) यांच्या विवाहाची मिरवणूक निघाली. फेटे बांधलेले वराती लग्नासाठी सोबत होतेच. सनईच्या स्वरात सर्वांचे मंडपात दिलखुलास स्वागत करण्यात आले.
लग्नघटिका समीप आली असताना वर-वधूंनी नवजीवनात प्रवेश करताना पहिले पाऊल मतदानाचा संकल्प करून टाकले. त्यांनी इतरांनाही मतदान करण्याचे आवाहन केले. विवाहात ज्येष्ठांनी आशीर्वाद देतानाच थोरामोठ्यांचा मान ठेवण्याचा, सामाजिक जबाबदारी पार पाडण्याचा संदेश दिला. त्याचे पालन करण्याचा निश्चय करतानाच देशाविषयीचे कर्तव्य म्हणून मतदान करणार असल्याचे सांगितले. नव्या संसाराची सुरुवात येत्या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचा संकल्प करून नवविवाहित जोडप्याने करून एक मोठा सामाजिक संदेश समाजाला दिला. मतदान जनजागृतीत वऱ्हाडी मंडळीला मतदानाचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत सर्वांनी मतदान करण्याची प्रतिज्ञा घेतली.
“वधू ही वडगाव डाळ(ता. भोर) येथे गावात सून म्हणून प्रवेश करताना सर्वजण उपस्थित नागरीक सजग मतदार म्हणून मतदान करेल. तसेच उपस्थित नागरिकांनीही १०० टक्के मतदानात सहभाग घ्यावा”, असे पुणे महानगरपालिकेच्या समूह संघटिका अपर्णा मोरे, सुवर्णा मोरे यांनी सांगितले. “संसाराच्या कर्तव्यासोबत आम्ही देशाप्रती असणारे कर्तव्यही पार पाडणार असून मतदान करणार आहे”, असे वर जयराज आणि वधू अक्षदा म्हणले. या विवाह समारंभाचे प्रभावी सूत्रसंचालन “निवेदक विठ्ठल पवार” यांनी करत, भोरचे प्रांत निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कचरे व तहसीलदार सचिन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली याबाबत मतदान जनजागृती बाबत नागरिकांना आवाहन करत मतदानाचे महत्व विशद केले.