पुणे रिंगरोडसाठी टेंडर प्रक्रिया सुरु; कामाचे टप्पेही तयार, वाचा सविस्तर
पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेला रिंगरोड प्रकल्प मार्गी लागण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल पुढे पडले आहे. या कामासाठी ‘एमएसआरडीसी’ने टेंडर मागविले आहेत. पश्चिम भागातील रस्त्यासाठी पाच टप्पे, तर पूर्व भागातील रस्त्यासाठी चार टप्पे बनविण्यात आले आहेत.
पुढील महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी प्रकल्पाचे भूमिपूजन करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली. हा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून त्यास ‘विशेष राज्य महामार्गा’चा दर्जा देण्यात आला आहे. ‘एमएसआरडीसी’ने यापूर्वीच ठेकेदार कंपन्यांची पात्रता तपासण्यासाठी टेंडर प्रक्रिया राबविली होती. आता प्रत्यक्ष काम देण्यासाठी ठेकेदार कंपनी नेमण्यासाठीची टेंडर प्रक्रिया सुरु केली आहे. त्यानुसार १७ जानेवारी ते १ मार्चपर्यंत टेंडर भरण्याची मुदत आहे.
पूर्व व पश्चिम रिंगरोडची एकूण लांबी १३६ किमी असून रुंदी सुमारे ११० मीटर इतकी असणार आहे. पूर्व रिंगरोड ७१.३५, तर पश्चिम रिंगरोड ६५.४५ किमी लांबीचा आहे. पश्चिम भागातील रिंगरोडसाठीचे भूसंपादन जवळपास ऐंशी टक्के झाले आहे. हे काम लवकर सुरु करण्यासाठी पाच टप्पे अर्थात पाच पॅकेज करण्यात आली आहेत. आठ बोगदे, तीन छोटे पूल, दोन मोठे पूल आणि खडकवासला धरणाच्या बॅकवॉटरवरुन अर्धा किलोमीटर लांबीचा मोठा पूल अशी कामे होणार आहेत. पाच टप्प्यांतील काम एकाच वेळी सुरु करण्याचा अधिकाऱ्यांनी प्रयत्न आहे. पश्चिम रिंगरोड भोर, हवेली, मुळशी आणि मावळ या तालुक्यांतून जाणार आहे. पूर्व रिंगरोड हा मावळ, खेड, हवेली, पुरंदर आणि भोर या तालुक्यांतून जाणार आहे.
पश्चिम रिंगरोड टप्पे (अंतर किमीमध्ये)
पहिला टप्पा – १४
दुसरा टप्पा – २०
तिसरा टप्पा – १४
चौथा टप्पा – ७.५०
पाचवा टप्पा – ९.३०
पूर्व रिंगरोड टप्पे
पहिला टप्पा – ११.८५
दुसरा टप्पा – १३.८०
तिसरा टप्पा – २१.२०
चौथा टप्पा – २४.५०
पूर्व आणि पश्चिम भागातील रिंगरोडच्या कामासाठी ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत. निविदा भरण्यासाठी एक मार्च पर्यंत मुदत देण्यात आली आहे. दाखल झालेल्या निविदा चार मार्च रोजी उघडण्यात येतील.
-राहुल वसईकर, अधिक्षक अभियंता, एमएसआरडीसी