मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानुसार सकल मराठा समाज भोर च्या वतीने गावोगावी साखळी उपोषण लवकरच सुरू करणार – अध्यक्ष संजय भेलके
भोर : मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार १ डिसेंबरपासून मराठा समाजाने उपोषण सुरु केले आहे. प्रत्येक तालुक्यात अन् तेथील गावांमध्ये साखळी उपोषण सुरु केले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी शुक्रवारपासून पुन्हा मराठ्यांचा एल्गार पहावयास मिळत आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी तिसऱ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौऱ्यामध्ये कराड, सातारा, मेढा, वाई, भोर, महाड, पुणे येथे मोठ्या सभा घेतल्या होत्या. या सभांमधून त्यांनी १ डिसेंबरपासून गावोगावी साखळी उपोषण करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार हे आंदोलन पुन्हा गतीमान होत आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे सुरु असलेल्या आंदोलनस्थळी शासनाच्या शिष्टमंडळाने भेट दिली. त्यामध्ये जरांगे पाटील यांनी शासनाला दोन महिन्याची मुदत दिली. त्यावेळी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सर्कलनिहाय साखळी उपोषण तसेच गावबंदीचे आंदोलन चांगले पेटले होते. जरांगे पाटील यांनी आंदोलनाला स्थगीती दिल्यानंतर जिल्ह्यातील आंदोलनाची धगही कमी झाली तरीही काही तालुक्यात साखळी उपोषण अद्यापही सुरु आहे.
मराठा आरक्षण मिळण्यासाठी शासनाला जाग येणे गरजेचे आहे. आज मराठ्यांवर झालेल्या अन्यायाबाबत वाचा फोडण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी आंदोलनाचा मार्ग निवडला आहे. यासाठी आमचाही लढा आता भोर तालुक्यातील गावोगावी सुरु राहणार असल्याचे व भोर शहरात साखळी उपोषण लवकरच चालू करणार असल्याचे भोर तालुका सकल मराठा समाज चे अध्यक्ष संजय भेलके यांनी सांगितले.