हॉटेल मालकाने अंडाकरीत अंडे दिले नाही म्हणून एका तरुणाने चक्क केला “डायल ११२” ला फोन; खेड शिवापूर परिसरातील घटना
खेड शिवापूर : आपत्कालीन परिस्थिती मध्ये कोणी संकटात असेल तर त्या व्यक्तीला त्वरित मदत मिळावी यासाठी शासनाच्या वतीने ११२ हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. कोणत्याही गैरप्रकारावर पोलिसांची तात्काळ मदत मिळवण्यासाठी हा क्रमांक उपयोगी ठरतो. मात्र अनेकवेळा काही महाभाग कोणत्याही क्षुल्लक करणासाठी “डायल ११२” वर फोन करतात आणि त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढत असून अशा प्रकारांमुळे पोलिसांचा वेळ वाया जातो.
असाच एक प्रकार काही दिवसांपूर्वी पुणे-सातारा महामार्गावरील खेड-शिवापूर परीसरातील एका हॉटेल मध्ये घडला. या हॉटेलमधून एका ग्राहक तरुणाने “डायल ११२” वर फोन केला. सबंधित तरुण काहीतरी अडचणीत आहे हे समजून त्याठिकाणी पोलिस ताबडतोब दाखल झाले. परंतु तिथे जाऊन पोलिसांनी सबंधित तरुणाला विचारले की काय झाले? तर त्या तरुणाने जे उत्तर दिले ते ऐकून सगळे जण आश्चर्यचकित झाले, तो तरुण बोलला की, “मी अंडा करी मागवली होती. पण हॉटेलच्या वेटरणे मला फक्त करी दिली अंडे दिलेच नाही.” आता ही गोष्ट ऐकून पोलिसांनी कपाळालाच हात लावला. तरीही त्यांनी हॉटेल मालकाला बोलावून याला अंडे का दिले नाही याचा जाब विचारला. त्यावर हॉटेल मालक बोलला, “अहो अंडा करी दिल्याबरोबर या तरुणाने पटकन त्यातील अंडे खाऊन टाकले, आणि पुन्हा अजून अंडे पाहिजे म्हणून आमच्याशी भांडतो आहे.” हॉटेल मालकाचे हे उत्तर ऐकून पोलिसांनी त्या तरुणाला खडसावले आणि निघून गेले. अशा व्यक्तींमुळे खरंच ज्या व्यक्तीला पोलिसांच्या मदतीची गरज आहे. ती व्यक्ती या मदतीपासून वंचित राहते. त्यामुळे अशा प्रकारे शुल्लक कारणासाठी “डायल ११२” वर फोन करून पोलिसांचा वेळ वाया घालवणाऱ्या महाभागांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची आवश्यकता आहे.