पोलीस असल्याचे सांगून भोर-कापूरव्होळ रस्त्यावर संगमनेर गावच्या हद्दीत बाजारवाडीतील ज्येष्ठाला लुटले
कापूरहोळ : ‘आम्ही पोलिस आहोत. तुम्हाला चेक करायचे आहे,’ अशी बतावणी करून ज्येष्ठ व्यक्तीला त्यांच्याकडील पैसे, मोबाईल व गळ्यातील सोन्याची साखळी रुमालात बांधून देण्यास सांगितले. मात्र, सोन्याची साखळी देण्यास ज्येष्ठाने विरोध केला. त्यामुळे चोरट्यांनी त्यांच्याकडील १५ ग्रॅम वजनाची अंदाजे ९० हजार रुपयांची सोन्याची साखळी हिसकावून पळ काढला. भोर- कापूरव्होळ रस्त्यावर संगमनेर येथे हा चोरीचा प्रकार झाला. याबाबत सुरेश विठोबा हवालदार (वय ६२, रा. सध्या पुणे, मूळगाव बाजारवाडी, ता. भोर) यांनी राजगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. १४ जानेवारी) दुचाकीवरून भोर येथून कापूरव्होळकडे येत होते. त्यावेळी संगमनेर येथील ‘समर्थ स्नॅक्स सेंटर’ या हॉटेलसमोर पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या दुचाकीला दुचाकी आडवी लावून, ‘तुम्हाला ऐकायला येत नाही का? भोरला काय झाले आहे माहिती आहे का?’ असे म्हणून, ‘तुम्हाला चेक करायचे आहे,’ असे म्हणत खिशातील पैसे व मोबाईल व गळ्यातील सोन्याची साखळी रुमालात बांधायला सांगितली. मात्र, त्याचा संशय आल्याने त्यांनी, ‘सोन्याची साखळी कशासाठी?’ असा प्रश्न करत सोन्याची साखळी रुमालात बांधण्यास नकार दिला. यावेळी एका चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावली व दोघांनी दुचाकीवरून भोरच्या दिशेने पलायन केले. या प्रकरणी पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार नाना मदने पुढील तपास करत आहेत.