भोरच्या डोंगर रांगातील रानमेवा बहरला
भोर : तालुक्यात सद्या डोंगर रांगांमधील जंगल परिसरात रानमेवा बहरला असून चिमुकल्यांची डोंगर रांगांकडे पावले वळली जात आहेत. करवंदे, फणस, जांभूळ, आंबा, आळू, आसाना, तुती, आंबुळके खाण्यासाठी चिमुकल्यांची लगबग सुरू झाली आहे. तालुक्यातील डोंगररांगांमध्ये अनेक प्रकारच्या झाडपाल्यांची वनऔषधे असून सद्या जंगल तसेच ग्रामीण भागातील गावठाण शेजारील परिसरात रानमेवा बहरला आहे. चिमुकल्यांना उन्हाळ्याची सुट्टी लागल्याने चिमुकले रानमेव्याचा आस्वाद लुटण्यासाठी डोंगर भागात जात आहेत.
डोंगररागांमध्ये चिमुकल्यांना सहजरीत्या करवंदे(काळी मैना), जांभूळ, आसाना, आंबुळके खाण्यास मिळत आहेत. जंगल भागातील सर्वच फळे नैसर्गिक स्वच्छ व औषधी असल्याने शहरातून गावाकडे सुट्टीसाठी आलेल्या चिमुकल्यांना हा रानमेवा खाण्याची दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत ओढ लागलेली असते. रानमेव्याच्या शोधार्थ ग्रामीण भागातील डोंगररगांमध्ये चिमुकल्यांची धावपळ सुरू आहे. वर्षातून एकदा तरी डोंगररांगांमधील औषधी झाडपाला तसेच विविध प्रकारची फळे खाल्ल्यास अनेक आजारांवर त्याचा फायदा होतो असे नेरे(ता.भोर) येथील प्रगतशील शेतकरी विठ्ठल गणपती म्हस्के यांनी सांगितले.