रस्ता रुंदीकरणाचे काम जलद गतीने करण्याच्या दृष्टीने भोर ते मांढरदेव रस्ता आजपासून २० ते २५ दिवस राहणार बंद
भोर : भोर ते मांढरदेव दरम्यानच्या घाट रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम जलद गतीने करण्याच्यादृष्टीने आज शुक्रवार(दि. ३ मे) पासून हा रस्ता २० ते २५ दिवस बंद राहणार असल्याची माहिती सार्वजनिक विभागाच्यावतीने देण्यात आली. भोर ते मांढरदेव तसेच वाई ते मांढरदेव घाट रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रिटिकरण करण्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून वेगाने सुरू आहे.
काम सुरु असल्याने रोजचे दळणवळण करणाऱ्या स्थानिकांना तसेच काळूबाई देवीस दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच काही दिवसांतच पावसाळा सुरू होत असल्याने काम करण्यास बरेच अडथळे येऊ शकतात, या बाबी लक्षात घेऊन आता रस्त्याच्या कामाला खूप वेग आल्याचे दिसून येत आहे.
भोरवरून मांढरदेवला जाणाऱ्या रस्त्याचे काम खूप जलद गतीने सुरू असून भोर घाटातील महत्वाचा टप्पा असलेल्या वरवडी कॉर्नर नावाच्या ठिकाणच्या यू अकराच्या वळणाजवळ काम जलद गतीने सुरू आहे. त्याठिकाणी वरील डोंगराची भौगोलिक परिस्थिती पाहता आणि त्यातच देवीला दर्शनाला येणाऱ्या भाविकांची मोठी संख्या पाहता काम करण्यास मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत.
अशा परिस्थितीत तिथे अपघात होण्याची शक्यता देखील नाकरता येत नाही. म्हणून पुढे येणारे धोके लक्षात घेऊन तसेच काम जलद गतीने पूर्ण करुन घेण्यासाठी सार्वजनिक बांधकामच्या (दक्षिण) पुणे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्यावतीने भोर ते मांढरदेव घाट रस्ता २० ते २५ दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.