जिल्ह्यातील सर्वात उंच ४ हजार पाचशे फुटावरील दुर्गम रायरेश्वर मतदान केंद्र पथकाचे राजेंद्र कचरे यांच्या हस्ते साहित्य वाटप
भोर : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्या मंगळवारी(दि. ७ मे) सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे. या मतदारसंघात २३ लाख ७२ हजार मतदार असून, एकूण २ हजार ५१६ मतदान केंद्र आहेत. यामध्ये असणाऱ्या २०३ भोर विधानसभा मतदार संघात ५६१ मतदान केंद्र असून ४०६२ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मतदानाच्यादृष्टीने या मतदार संघातील सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
या दरम्यान भोरचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी २०३ भोर विधानसभा मतदारसंघाचे साहित्य वाटपाची सुरुवात पुणे जिल्ह्यातील सर्वात उंचावरील म्हणजे ४ हजार पाचशे पाच फुटावरील व दुर्गम भागातील ऐतिहासिक अशा रायरेश्वर या मतदान केंद्राच्या पथकाचे साहित्य वाटप करून केली. यावेळी सदर पथकास मतदान केंद्रावर लोखंडाच्या शिडीच्या साहाय्याने ट्रेक करून जावे लागत असल्याने तेथील अधिकाऱ्यांना भारत निवडणूक आयोगाने विशेष तयार केलेल्या बॅकपॅकही यावेळी देण्यात आलेल्या आहेत. याप्रसंगी भोरचे प्रांत तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कचरे, भोरचे तहसीलदार सचिन पाटील यांच्या समवेत इतरही अधिकारी उपस्थित होते.