“कधी पर्यंत वेल्हे तालुक्याची ओळख आम्ही दुर्गम म्हणूनच सांगू ?”, राजगड(वेल्हे) तालुक्यातील तरुणीने खा. सुप्रिया सुळेंना केलेला मेल व्हायरल
राजगड(वेल्हे) : महाराष्ट्रातील नामवंत अशा पुणे शहरापासून अवघे ५०-६० किलोमीटर अंतरावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीचा पाया असणाऱ्या व तब्बल २६ वर्ष स्वराज्याच्या राजधानीचा मान मिळालेल्या राजगड(वेल्हे) तालुका अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित असल्या बाबतचा मेल वेल्ह्यातील एका तरुणीने बारामती लोकसभा मतदार संघाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंना केला आहे. मयुरी राजेंद्र पांगारे(रा. वेल्हे) असे या तरुणीचे नाव आहे. वेल्हे तालुका मूलभूत सुविधांपासून कसा वंचित आहे याबाबतचे अनेक प्रश्न मेलद्वारे या तरुणीने उपस्थित केले आहेत. “नोकरी निमित्त रोज वेल्हे ते पुणे प्रवासासाठी योग्य सुविधा उपलब्ध नसल्याने वेल्हे तालुक्यातील आम्ही मुले-मुली जगात चालणाऱ्या स्पर्धांना कसे तोंड देऊ? कसे या स्पर्धेच्या युगात सहभागी होऊ? कसे पाय रोऊन उभे राहू? कधी पर्यंत वेल्हे तालुक्याची ओळख आम्ही दुर्गम म्हणूनच सांगू? तालुका असलेल्या गावात ना शिक्षणाची सोय आहे, ना त्या शिक्षणा साठी बाहेर जाण्यासाठी लागणाऱ्या सरकारी सुविधांची, कधी पर्यंत हा प्रश्न असाच राहणार आहे? याच अशा प्रश्नांमुळे कित्येक मुले-मुली शिक्षणापासून वंचित राहिलेल्या आहेत.” तुमच्याच बारामती लोकसभा मतदारसंघात असणाऱ्या वेल्हे तालुक्यातील हे मूलभूत प्रश्न लवकरात लवकर तुम्ही मार्गी लावावेत. अशी विनंती या तरुणीने या मेलद्वारे केली आहे.
या तरुणीने केलेला संपूर्ण मेल खालीलप्रमाणे
आदरणीय ताई, तुम्हाला मेसेज करण्याचे मुख्य कारण म्हणजे सामान्य जनतेचे चाललेले हाल, मी कु. मयुरी राजेंद्र पांगारे तुमच्याच वेल्हा तालुक्यातील वेल्हे गावाची स्थानिक रहिवासी असून नोकरी निमित्त वेल्हे ते पुणे मला रोज प्रवास करावा लागतो. हे सगळ ठीक आहे ती परिस्थिती आम्ही स्वीकारली देखील आहे. त्यासाठी आपण पी. एम.पी.एम.एल. सेवा चालू सुद्धा केली, ती आधी वेल्हे पर्यंत होती नंतर काही कारणास्तव ती बंद होऊन पी.एम.आर.डी. हद्दी पर्यंत चालू ठेवण्यात आली. जे की योग्य आहे पण ती पी.एम.आर.डी. हद फक्त पाबे पर्यंत आहे, तिथून पुढे काय? एस टी महामंडळ च्या एस टी ने प्रवास करावा तर त्याची सुविधा नीट नाही. उलट तालुका च्या ठिकाणी एकच एसटी येणार, तिचा काही टाईम फिक्स नाही ना काहीच, तिच एक एस टी तिथून पुढे मावळ भागात जाते जसे की कोदापुर इ. गावात तीच एसटी पुढे वेल्ह्यात येते तिथून चेलाडी, वेल्हे गावाला ना पी.एम.टी. ची सुविधा नीट आहे ना एसटी ची, रोज प्रवास करण्यासाठी कोणतीच सुविधा वेल्हा तालुक्यात ठीक नाहिये जे की वडाप, जीप वाले आहेत त्यांची दादागिरी चालू आहे. इथ पर्यंत नाही सोडणार, इथ पर्यंत यावं लागेल, ज्या सुविधा आहेत त्याचा वापर तर नाहीच तर त्या सुविधा देखील उपलब्ध नाहीयेत, अशा वेळी माझ्या सारख्या कित्येक मुलींनी काय करावे ज्यांना रोज नोकरी निमित्त प्रवास करावा लागतो, आज आपल्या तालुक्यात खूप मुला मुलींना शिक्षणा निमित्त, नोकरी निमित्त सतत प्रवास करावा लागतो पण त्या प्रवासासाठी कोणती ही सुविधा नीट उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत आम्ही वेल्हा तालुक्यातील मुले मुली जगात चालणाऱ्या स्पर्धांना कसे तोंड देऊ? कसे या स्पर्धेच्या युगात सहभागी होऊ? कसे पाय रोऊन उभे राहू? जिथे बेसिक सुविधाच आम्हाला उपलब्ध होत नाहीत, कधी पर्यंत वेल्हे तालुक्याची ओळख आम्ही दुर्गम म्हणूनच सांगू? तालुका असलेल्या गावात ना शिक्षणाची सोय आहे ना त्या शिक्षणा साठी बाहेर जाण्यासाठी लागणाऱ्या सरकारी सुविधांची, कधी पर्यंत हा प्रश्न असाच राहणार आहे? याच अशा प्रश्नांमुळे कित्येक मुले मुली शिक्षणापासून वंचित राहिलेल्या आहेत. आपण हे प्रश्न मार्गी लावाल अशी आशा व्यक्त करते.
तुमच्याच मतदासंघांतील सामान्य नागरिक,
कु. मयुरी राजेंद्र पांगारे
महाराष्ट्रातील जवळजवळ सर्व तालुक्यांमध्ये एस .टी. डपो आहे . मग राजगड ( वेल्हा ) या पासून वंचित का?