पोलीस असल्याचे सांगून अडीच तोळ्याची चैन चोरट्यांकडून लंपास; भोर तालुक्यातील दिवळे येथील घटना
कापूरव्होळ : सासवड मार्गावरील दिवळे येथील प्रकार कापूरव्होळ-सासवड मार्गावरील दिवळे(ता.भोर) येथे रस्त्याच्या कडेला कांदा विक्रीसाठी बसलेल्या तरुणाची दोन अज्ञात इसमांनी पोलिस असल्याची बतावणी करून अडीच तोळे वजनाची सोन्याची १ लाख ५० हजारांची चैन गळ्यातून हिसकावून लंपास केल्याची घटना सोमवार(दि.६ जून) घडली आहे. याबाबत पांडुरंग दीपक पांगारे(रा.दिवळे, ता.भोर) यांनी दोन अज्ञात इसमां विरोधात राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवळे(ता.भोर) गावच्या हद्दीत कापूरव्होळ-सासवड मार्गावर असणाऱ्या दुकानावर पांडुरंग पांगारे हे स्वतः कांदे विकत असताना अज्ञात दोन इसम त्यांच्या जवळ आले आणि आम्ही पोलीस आहोत असे सांगून तुम्ही गळ्यामध्ये एवढे सोने घालून फिरू नका. तसेच दोन गुंड इकडे आले असल्याचे त्यांनी पांगारे यांना सांगितले. त्यावेळी फिर्यादी पांगारे यांनी तुमचे आयडी दाखवा असे म्हणाले असता फिर्यादीशी अज्ञात चोरट्यांनी हुज्जत घालून दमदाटी करत गळ्यातील सोन्याची चैन व सूर्य आकाराचे सोन्याचे पान असे एकूण १ लाख ५० हजार रुपयांचे बळजबरीने सोन्याची चैन चोरून नेली. सदर घटनेचा पुढील तपास राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार नाना मदने करीत आहेत.