जमिनीच्या व्यवहारात खरेदीखतास टाळाटाळ; सांगवी खुर्द येथील दांपत्यावर राजगड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गु्न्हा दाखल

नसरापूर : जमिनीचा ठरल्याप्रमाणे व्यवहार करून खरेदीखत न देता पाच लाख वीस हजार रूपये घेऊन नंतर विक्रीस टाळाटाळ करून फसवणूक केल्याप्रकरणी खरेदीदार महिलेच्या तक्रारी नुसार राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गीतांजली सुरेश पांगारे आणि सुरेश लक्ष्मण पांगारे(दोन्ही रा. सांगवी खुर्द ता. भोर) असे गुन्हा दाखल झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. या प्रकरणी सुषमा विनायक शिंदे(वय ३८ वर्षे, रा. करंजावणे, ता. राजगड(वेल्हे)) यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

राजगड पोलिसांनी दिलेल्या माहीती नुसार, माळेगाव(ता.भोर) येथील गट नंबर ३६६ मधील गिंताजली सुरेश पांगारे यांच्या हिश्शाचे ५.११ आर क्षेत्र गितांजली व त्यांचे पती सुरेश पांगारे यांनी सुषमा विनायक शिंदे यांना १६ लाख ३५ हजार रुपयांना विक्री करण्याचे ठरवले होते. त्यासाठी १२ नोव्हेंबर २०२० रोजी विसार पावती करुन पाच लाख रुपयांचे तीन चेक गितांजली पांगारे यांच्या नावे देण्यात आले व ते पैसे गितांजली यांच्या खात्यावर जमा देखिल झाले. या नंतर कागदपत्रांची पुर्तता करुन दोन महिन्यात खरेदीखत करुन देतो असे पांगारे पती पत्नी यांनी सांगितले होते.

Advertisement

दरम्यान शासकीय मोजणीसाठी सप्टेंबर २०२२ मध्ये शिंदे यांनी पांगारे यांना अजुन २० हजार रुपये दिले त्यानंतर बराच कालावधी झाला तरी पांगारे यांनी खरेदीखत करुन न देता टाळाटाळ करु लागले. तेव्हा सुषमा शिंदे यांचे सासरे, सासु व पती यांनी व्यवहारातील मध्यस्थ नामदेव तानाजी झेंडे, निवृत्ती तानाजी झेंडे व दशरथ बबन धावले यांना घेऊन पांगारे यांच्या घरी दोन वेळा बैठक घेऊन या बाबत विचारणा केल्यावर पांगारे यांनी खरेदीखत करुन देतो असे सांगितले. परंतु प्रत्यक्षात टाळाटाळच करु लागले. त्यांना खरेदीखत करुन द्या अथवा आमचे ५ लाख २० हजार रुपये परत द्या असे सांगितल्यावर देखिल त्यांनी व्यवहार पुर्ण केला नाही व पैसे देखिल परत दिले नाही. त्यानंतर राजगड पोलिसांनी गितांजली सुरेश पांगारे व सुरेश लक्ष्मण पांगारे यांच्या विरुध्द फसवणुक व विश्वासाचा भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय सुतनासे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page