“बारामतीमधील ईव्हीएम मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँग रुमचे सीसीटीव्ही ४५ मिनिटं का बंद होते?”
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. सर्व ईव्हीएम मशिन्स ज्या स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आले होते, तेथील सीसीटीव्ही बंद झाल्याचा प्रकार सोमवारी सकाळी घडला होता. तब्बल ४५ मिनिटे सीसीटीव्ही मॉनिटरिंग बंद असल्याचं निदर्शनास आल्याने एकच खळबळ उडाली.
बारामतीच्या स्ट्राँग रुममधील सीसीटीव्ही बंद असल्याची बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. त्यामुळे यंत्रणेची धावपळ उडाली. त्यानंतर काही वेळातच सीसीटीव्ही मॉनिटरिंग सुरु झालं. तब्बल ४५ मिनिटे हे कॅमेरे बंद होते. या प्रकरणी निवडणूक विभागने स्पष्टीकरण दिलं आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी सांगितलं की, या प्रकरणाची सविस्तर चौकशी केली आहे. इलेक्ट्रिक कामासाठी केबल काढल्याने सीसीटीव्ही मॉनिटरिंग बंद होतं. सीसीटीव्ही कॅमेरे सुरच होते, त्याचा डेटा रेकॉर्ड झालेला आहे. परंतु केवळ डिस्प्ले बंद होतं, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.
लक्ष्मीकांत खाबिया यांनी याबाबत उठवला होता आवाज
“बारामती लोकसभा मतदारसंघाचे ईव्हीएम मशिन्स ज्या गोदामात ठेवलेले आहे त्या गोदामाचे सीसीटीव्ही सकाळी १०:२५ पासून ४५ मिनिटांपासून बंद आहेत. त्यामुळे यामध्ये काही काळंबेरं तर नाही ना याची शंका येत आहे”. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचे निवडणूक प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया यांनी याबाबत आवाज उठवला होता.