धरणात उडी मारून पलायन करणार्या सराईत दारू विक्रेत्यास सिनेस्टाईल पद्धतीने पोहत पाठलाग करत पोलिसांनी केले जेरबंद
राजगड : पुणे-पानशेत रस्त्यावरील खडकवासला धरणा काठीच्या ओसाडे येथील बेकायदा गावठी दारू विक्री धंद्यावर वेल्हे पोलिसांनी अचानक धाड टाकली. पोलिस आल्याची माहिती मिळताच मुद्देमाल जागेवर सोडून दारू विक्रेत्याने खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात उडी मारली. त्याला पकडण्यासाठी त्या वेळी क्षणाचाही विलंब न करता धाड टाकण्यासाठी आलेल्या वेल्हे पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलिस उपनिरीक्षक आप्पासाहेब पडळकर यांनी अंगावरील कपड्यांसह धरणात उडी मारली.
यावेळी आरोपी हा धरणात पोहत पलीकडील सांगरुण गावच्या काठाकडे पळून चालला होता. पोलिस उपनिरीक्षक पडळकर यांनी वेगाने पोहून पाठलाग करीत आरोपीस धरणाच्या मध्यभागीच जेरबंद केले. यावेळी परिसरातील नागरिकांनी तब्बल अर्धा-पाऊण तास सिनेस्टाईल पद्धतीने चाललेले थरारनाट्य अनुभवले. अभिमन्यू ईश्वर नानावत(रा. ओसाडे, ता. राजगड) असे अटक केलेल्या दारू विक्रेत्याचे नाव आहे. याप्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सदरची कारवाई ही सहायक पोलिस निरीक्षक नितीन खामगळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आप्पासाहेब पडळकर, सहाय्यक फौजदार राजाराम होले, पोलिस हवालदार पंकज मोघे, मयूर जगताप यांच्या पथकाने केली आहे.