रिंगरोडच्या पूर्व भागातील हवेली, खेड तालुक्यातील १५ गावांमधील भूसंपादनाचे निवाडे जाहीर

पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) प्रस्तावित केलेल्या रिंगरोडच्या पूर्व भागातील हवेली आणि खेड तालुक्यातील १५ गावांमधील जमिनींच्या संपादनाचे निवाडे जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकल्पाच्या भूसंपादनाला वेग आला आहे.

रस्ते महामंडळाकडून हाती घेण्यात आलेला प्रकल्प रिंगराेड प्रकल्प पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात ११० मीटर रुंदीचा आणि १७२ किलाेमीटर अंतरांचा आहे. यासाठी पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग करण्यात आले असून, पूर्व भागातील मावळ तालुक्यातील ११, खेडमधील १२, हवेलीतील १५, पुरंदरमधील ५ आणि भोरमधील ३ गावांचा समावेश आहे, तर पश्चिम भागातील भोर तालुक्यातील १, हवेलीतील ११, मुळशीतील १५ आणि मावळ तालुक्यातील ६ गावांचा समावेश आहे. पश्चिम मार्गावरील ३४ गावांपैकी ३१ गावांमधील ६४४ हेक्टर भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी २ हजार ९७५ कोटी रुपये मोबदला देण्यात आला आहे. भोर तालुक्यातील ५ गावे वगळून शिवरे गावाचा समावेश झाल्याने या गावातील मूल्यांकनाचे दरनिश्चितीचे काम आचारसंहितेपूर्वी सुरू करण्यात आले होते.

Advertisement

पश्चिम भागाच्या भूसंपादनासाठी यापूर्वीच ‘हुडको’कडून १० हजार कोटींचे कर्ज घेण्यात आले आहे. त्यातून पश्चिम भागाचे बहुतांश भूसंपादन मार्गी लागले आहे. पूर्व भागाच्या भूसंपादनासाठी रस्ते महामंडळाला निधीची गरज होती. त्यानुसार महामंडळाने राज्य सरकारकडे निधीची मागणी केली होती. त्यानुसार उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्पात भूसंपादनासाठी तब्बल १० हजार ५१९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

या गावातील निवाडे जाहीर

जिल्हा प्रशासनाकडून या प्रकल्पाच्या पूर्व भागातील खेड आणि हवेली तालुक्यातील जमिनींच्या संपादनाबाबत निवाडे जाहीर करण्यात आले आहेत. हवेली तालुक्यातील मौजे भिवरी, गावडेवाडी आणि वाडेबोल्हाई, तर खेड तालुक्यातील सोळू, निघोजे, मोई, मरकळ, कुरुळी, खालुंब्रे, केळगाव, गोळेगाव, धानोरे, चिंबळी, चऱ्होली आणि आळंदी या गावांचा समावेश आहे. हवेली तालुक्यातील गावांसाठी ६४ कोटी २९ लाख रुपये, तर खेड तालुक्यातील गावांसाठी सुमारे ४७६ कोटी ७२ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page