दोष कुणाचा, बळी कोण? कापूरहोळ चौक अजून किती जणांचा बळी घेणार?
कापूरहोळ : पुणे-सातारा महामार्गावरील कापूरहोळ(ता.भोर) येथील चौकात गावातीलच एका पुरुषाचा अकाली अपघाती मृत्यू झाला. ही घटना कशी घडली? हा पोलीस चौकशीचा भाग असला तरी एक प्रश्न मात्र आवर्जून उपस्थित होत आहे. तो म्हणजे कापूरहोळ चौक अजून किती जणांचा जीव घेणार आहे?
महामार्गावरील कापूरहोळ मुख्य चौकात उड्डाणपूल नसल्यामुळे महामार्गावर शनिवारी(दि. १८ मे) रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी पायी चालत रस्ता ओलांडणाऱ्या कापूरहोळ गावातीलच विलास विठठल गाडे(वय ४८ वर्ष) यांना आपला जीव गमवावा लागला. इको कार(एम.एच.१४ डी.टी.२६५२) ने दिलेल्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. या चौकातील परिसरात आत्तापर्यंत ७२ अपघात झाले असून या अपघातातील काहींना आपले प्राण गमवावे लागले आहेत तर काहींना अपंगत्वाला सामोरे जावे लागले आहे. या घटनेने पुन्हा एका हसत्या-खेळत्या कुटुंबावर आभाळ कोसळले, परिसरातून हळहळही व्यक्त झाली. मात्र प्रश्न कायम राहिला, हे सगळं कधी थांबणार?
अपघात घडू नये यासाठी या चौकात कोणत्याही उपाययोजना केलेल्या दिसून येत नाहीत. कोणीही हा रस्ता पार करू नये यासाठी चौकातील रस्ता दुभाजकावर उंच अशी लोखंडी जाळी उभी करणे अपेक्षित आहे. परंतु या महामार्गाशी संबंधित अधिकारी राकेश कोळी(जनरल मॅनेजर, रिलायन्स) यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “रस्ता दुभाजकावर आम्ही मेटल क्रॅश बॅरिअर बसवला असून जाळी बसवण्याचा स्कोप आमच्याकडे नसून ते आमचे काम नाही”.
परंतु, याच अडचणीचा फटका अनेक निष्पाप जीवांना बसत आहे. यावर आता सर्वच घटकांनी एकत्र येत विविध उपाययोजना करायला हव्यात आणि भविष्यात पुन्हा अशा घटना घडणारी नाहीत याची काळजी घ्यायला हवी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.
लवकरात लवकर कापुरव्होळ चौकात उड्डाणपूल बांधण्यात यावा नाहीतर कितीतरी निष्पाप लोकांचा जीव जाईल आणि तीथे गरज पण आहे 🙏🚩🚩🙏