हरिश्चंद्रीकरांच्या भुयारी मार्गाचा बावीस फेब्रुवारीचा मुहूर्त टळला; लेखी आश्वासन देऊनही अद्याप कामाला सुरुवात नाही

कापूरहोळ : पुणे-सातारा महामार्गावर हरिश्चंद्री गावच्या हद्दीतील महामार्ग मृत्युचा सापळा बनला आहे. या ठिकाणी अपघात होवून अनेकांना आपला जीव गमावावा लागला तर काहींना कायमचे अपंत्वामुळे आपले जीवन असह्य झाले आहे. चुकीच्या पद्धतीने महामार्गाचे आरेखन आणि काही राजकीय नेत्यांनी केलेल्या हस्तक्षेपामुळे हरिश्चंद्रीकरांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी वारंवार केला आहे. गावातील तरुण युवक आणि नागरिकांनी गेली नऊ वर्षे याला वाचा फोडून संघर्ष केला असून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील हरिश्चंद्री फाट्यावर भुयारी मार्गाचे  कामाला २२ फेब्रुवारी रोजी सुरुवात होणार असल्याचे लेखी पत्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पश्चिम महाराष्ट्राचे अधिकारी राजेश कदम यांनी हरिश्चंद्री ग्रामस्थांना दि. ८ फेब्रुवारी रोजी दिले होते. परंतु आज २४ मे उजाडला तरी अद्याप कामाला सुरुवात केलेली नाही. त्यामुळे नागरिकांत तीव्र संताप आहे.

Advertisement

पुणे सातारा राष्ट्रीय महामार्ग हा हरिश्चंद्री गावाच्या मधून गेल्यामुळे हरिश्चंद्री ग्रामस्थांचे दळण वळण करण्यासाठी मोठी अडचण झाली होती. रस्त्यावरून शेतीच्या मशागतीच्या कामासाठी अलीकडे पलीकडे जाणे येणे, शेती मशागत करण्यासाठी लागणारी औजारे महामार्गाच्या पलीकडील बाजूला नेणे, गुरांना चाऱ्यासाठी रस्त्यापलिकडे जाने सुद्धा अवघड झाले होते. गावातील नागरिकांना बाजारपेठेत जाणे  लहान मूलांना शाळेत जाण्यासाठी महामार्गावरूनच जीव मुठीत घेऊन जावे यावे लागत होते. याच गावातील ७ ते ८ नागरिकांचा या ठिकाणी अपघात होऊन त्यांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. या गोष्टींना कंटाळुन हरिश्चंद्री ग्रामस्थांनी गेली ८ ते ९ वर्षे आंदोलनाचा पवित्रा घेत उपोषणे, शोले स्टाईल पाणी टाकीवर आंदोलन, रास्ता रोको, अशी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने केली होती. परंतु लबाड अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा हरिश्चंद्री ग्रामस्थांनच्या जखमेवर मीठ चोळले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी यांनी हरिश्चंद्रीकरांच्या भुयारी मार्गाचे काम तातडीने सुरू करावे अन्यथा पुन्हा अतितीव्र आंदोलनाचा पवित्रा नागरीक घेतील असे ग्रामस्थांनी निनाद महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितले. तसेच आंदोलनामूळे होणाऱ्या परिणामाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हे जबाबदार असतील असे देखील ग्रामस्थांनी यावेळी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page