खुशखबर! पोलीस पाटीलांना मिळणार आता १५ हजार रुपये मानधन तर आशासेविकांच्या मानधनात पाच हजार रुपयांची भरीव वाढ
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एका मागून एक निर्णयांचा धडाका लावला आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत पोलीस पाटील आणि आशासेविकांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस पाटील यांना यापुढे १५ हजार रुपये मानधन मिळणार आहे. त्याचबरोबर आशासेविकांच्या मानधनात पाच हजार रुपयांची भरीव वाढ करण्यात आली आहे.
आज मंत्रिमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विविध विभागासंदर्भातील अनेक निर्णय सरकारने घेतले आहेत. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता अनेक मोठे निर्णय घेतले जात आहेत.
ज्या गावांमध्ये पोलीस ठाणे नसते, त्या गावांमध्ये पोलीस पाटलांची नियुक्ती केली जाते. गावातील भांडण, हाणामाऱ्या आणि वादविवाद मिटवण्यासाठी पोलीस पाटील हे महत्वाची भूमिका बजावतात. पूर्वी पोलीस पाटलांना साडेसहा हजार रुपये मानधन मिळत होते. अनेक वर्षे पोलीस पाटलांचे मानधन ३ हजार रुपये होते. मात्र २०१९ मध्ये त्यात वाढ केली होती. ते मानधन ६ हजार ५०० इतके होते. पण आता पोलीस पाटील यांच्या मानधनात मोठी वाढ केली आहे. आता त्यांना १५ हजार रुपये मानधन मिळणार आहे. तर आशासेविकांच्या मानधनात देखील पाच हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.