पुणे-सातारा महामार्गावर वेळू गावच्या हद्दीत झालेल्या अपघातात दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू
खेड-शिवापूर : पुणे-सातारा महामार्गावरील वेळू गावच्या हद्दीत रविवारी(दि. ९ जून) रात्री १२ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विशाल अंकुश सकाटे (वय ३२ वर्ष, सद्या रा. खेड शिवापूर, मूळ रा. भुईंज, सातारा) असे मृत पावलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत राजगड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी(दि. ९ जून) रात्री वेळू गावच्या हद्दीत झालेल्या अपघातात विशाल सकाटे या युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. पुणे-सातारा महामार्गावरील वेळू गावच्या हद्दीतील पुलावर साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरून चाललेल्या विशाल याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच एम.एम. ॲम्ब्युलन्सचे चालक फत्तुभाई सुफियान यांनी घटनास्थळी जाऊन अपघाताची माहिती राजगड पोलिसांना दिली. राजगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन भोर येथील उपविभागीय रुग्णालयात शविच्छेदनासाठी पाठवला असून सदर घटनेचा पुढील तपास राजगड पोलीस करीत आहेत.