PUNE ACB TRAP CASE | वीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी रंगेहाथ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
पुणे : वडीलोपार्जीत शेत जमीनीचा ऑनलाइन सात-बारा उताऱ्यावर नाव दिसण्याकरीता २० हजार रुपये लाच घेताना खेड तालुक्यातील वासुली(ता. खेड, जि. पुणे) गावच्या तलाठ्याला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. सतीश संपतराव पवार(वय ५२ वर्ष, पद तलाठी (वर्ग-३), सजा-वासुली, ता. खेड, जिल्हा पुणे) असे अटक केलेल्या तलाठ्याचे नाव आहे. ही कारवाई सोमवारी(दि.१० जून) वासुली गावातील तलाठी कार्यालयात करण्यात आली.
याबाबत २९ वर्षीय तरुणाने पुणे एसीबीकडे तक्रार केली आहे. तक्रारदार यांची वडिलोपार्जित जमिनीच्या ऑनलाईन सातबारा वर आपले नाव दिसत नसल्याने तक्रारदार यांनी तलाठी सतीश पवार याची भेट घेतली. त्यावेळी त्याने तक्रारदाराकडे ३० हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदार यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली.
एसीबीच्या पथकाने १७ मे रोजी पडताळणी केली. त्यावेळी तलाठी सतीश पवार याने तक्रारदार यांच्याकडे वडीलोपार्जीत शेतजमीनीचा ऑनलाईन सात-बारा उताऱ्यावर त्यांचे नाव दिसण्यासाठी तीस हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडी अंती २० हजार स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार सोमवारी वासुली गावातील तलाठी कार्यालयात सापळा रचला. सतीश पवार याला तक्रारदार यांच्याकडून २० हजार रुपये लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी महाळुंगे पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर करीत आहेत.