पुणे जिल्ह्यातील सर्व अनधिकृत होर्डिंगवर पडणार PMRDA चा हातोडा; लवकरच कारवाईला सुरवात

पुणे : पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) अनधिकृत होर्डिंगवरील कारवाईला सुरवात होणार आहे. प्राधिकरणाकडून स्थापन केलेल्या स्वतंत्र आकाश चिन्ह विभागाच्यावतीने यंत्रणा तैनात करण्यात आली असून पुढच्‍या आठवड्यापासून या कारवाईला वेग येणार आहे.

‘पीएमआरडीए’च्या ९ तालुक्यात हजारो अनधिकृत होर्डिंग उभारण्यात आलेली आहेत. प्राधिकरणाने काही दिवसांपूर्वी या सर्व तालुक्यात सर्वेक्षण पूर्ण केले. त्यानुसार पहिल्‍या टप्प्यात १ हजारांच्या आसपास अनधिकृत होर्डिंग, जाहिरात फलक, बोर्ड याची माहिती गोळा केली आहे. त्याबाबत संबंधितांना नोटीस आणि मंजुरीबाबत अर्ज करण्याचे आवाहन केले होते. दरम्यानच्या काळात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने होर्डिंग विषयावर पुढील कार्यवाही होऊ शकली नाही. त्यातच कारवाई संदर्भात निविदा उघडण्यात येत नव्हती. प्राधिकरणाने जिल्हाधिकारी तसेच, राज्याच्या नगरविकास विभागाकडे देखील मार्गदर्शन मागवले होते. मात्र, आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर प्राधिकरणाने पुढील कार्यवाही सुरू केली आहे.

Advertisement

लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सोमवारी (ता. १०) होर्डिंग कारवाईबाबत मागवण्यात आलेले टेंडर उघडण्यात आले. खासगी ठेकेदाराला होर्डिंग कारवाईबाबत कार्यालयाने आदेश दिले आहेत. पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल यांची अंतिम स्वाक्षरी झाल्यानंतर होर्डिंग कारवाईची वाट मोकळी होणार आहे. ‘पीएमआरडीए’च्या नऊ तालुक्यात टपाटप्प्याने ही कारवाई करण्यात येणार आहे. त्याची सुरवात मुळशी तालुक्यातून होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी या तालुक्यात होर्डिंग कोसळल्याच्या जास्त घटना घडल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक ग्रामपंचायतीकडून माहिती मागविण्यात आलेली आहे.

परवानगीसाठी केवळ ३४१ अर्ज
‘पीएमआरडीए’ने अनधिकृत होर्डिंगधारकांना परवानगीबाबत आवाहन केले होते. त्यानुसार विविध गावातून जवळपास ३४१ अर्ज होर्डिंगची परवानगी मिळावी, यासाठी प्राप्त झाले आहेत. त्यातील सर्वाधिक अर्ज हे मुळशी आणि मावळ तालुक्यातील आहेत. तर, भोर आणि राजगड या तालुक्यातूनदेखील अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे त्याबाबत परवानगीसाठी आयुक्तांकडे अहवाल पाठवण्यात आलेला आहे.

”आचारसंहितेमुळे अनधिकृत होर्डिंगवरील कारवाई थांबली होती. आचारसंहितेत निविदा उघडल्‍या जात नव्‍हत्या. आता निविदा उघडल्‍या आहेत. त्‍यामुळे ‘पीएमआरडीए’च्‍या हद्दीतील सर्वच अनधिकृत होर्डिंग हटविण्यात येणार आहे. पुढच्‍या आठवड्यापासून कारवाईला सुरवात होणार आहे.
        – सचिन म्‍हस्‍के, तहसीलदार, आकाशचिन्‍ह विभाग, पीएमआरडीए.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page