पुणे जिल्ह्यात सोयाबीनचे घरगुती ३७ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध; जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात किती बियाणे उपलब्ध? सविस्तर वाचा

पुणे : सोयाबीन पिकाखालील पेरणी क्षेत्रांमध्ये दरवर्षी सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे वाढीव क्षेत्रानुसार गुणवत्तापूर्ण बियाण्याची उपलब्धता वाढविणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे प्रमाणित बियाणे व सत्यप्रत बियाणे उत्पादनाची साखळी विस्कळित झालेली आहे. त्यामुळे प्रमाणित/सत्यप्रत बियाण्याचा तुटवडा निर्माण होतो. यावर उपाय म्हणून ग्रामबीजोत्पादन संकल्पने अंतर्गत पुणे जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे घरगुती ३७ हजार ५४७ क्विंटल खात्रीशीर बियाणे सध्या शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहे.

मागील दोन वर्षात पेरणी केलेल्या प्रमाणित बियाण्यांपासून उत्पादित होणारे सोयबीन हे बियाणे म्हणून शेतकऱ्यांनी वापरल्यास उत्पादन खर्च कमी होऊ शकतो.
कृषी विभागाच्यावतीने व्यापक प्रमाणात सोयाबीन ग्रामबीजोत्पादन मोहीम राबविण्यात आली होती. याची फलनिष्पत्ती म्हणजे खरीप २०२४ हंगामात स्थानिक पातळीवर ३७ हजार ५४७ क्विंटल सोयाबीन बियाणे उपलब्ध झाले. खरीप २०२४ मध्ये पेरलेले सोयाबीन चांगल्याप्रकारे उत्पादित करून बियाणे योग्य पद्धतीने साठवणूक करावे, जेणेकरून सदर बियाणे खरीप २०२५ करिता पेरणीसाठी उपलब्ध होईल. अशाप्रकारे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी पुढील खरीप हंगामात पेरणीसाठी लागणारे बियाणे राखून ठेवल्यास बियाणे तुटवडा भासणार नाही. शेतकरी बांधवांनी सोयाबीन बियाणे उपलब्धतेची व्याप्ती वाढावी व सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी स्थानिक पातळीवर सोयाबीन ग्रामबीजोत्पादन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे, खरीप हंगामात गुणवत्तापूर्ण बियाणे उपलब्धतेची व्याप्ती वाढावी यासाठी रब्बी उन्हाळी हंगामात स्थानिक पातळीवर त्रुटीपूर्ती सोयाबीन बिजोत्पादन कार्यक्रम राबविणे, तीन टप्प्यांवर सोयाबीन बियाणे उगवणक्षमता तपासणी करणे, पेरणी पूर्वी सोयाबीन बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे. याअनुषंगाने सोयाबीन बियाणे वापराबाबत शेतकऱ्यांना वेळोवेळी कृषी विभागाच्या वतीने आवाहन केले होते.

Advertisement

सोयाबीन बियाणे उपलब्धता (क्विंटलमध्ये)
जुन्नर : ११,५४०
आंबेगाव : ५,२४२
खेड : १३,८४४
मावळ : ४००
मुळशी : ३२०
हवेली : ३७२
वेल्हे : ७०
भोर : १,३५७
पुरंदर : ६५०
बारामती : २,०००
इंदापूर : २६०
दौंड : ६०
शिरूर : १,४३२

सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पीक असून केंद्र शासनाच्या सूचनांनुसार त्यामध्ये बियाणे बदलाचे प्रमाण ३५ टक्क्यांपर्यंत असणे आवश्यक आहे. दरवर्षी पेरण्यात येणारे बियाणे हे सरळ वाणाचे असल्याने दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील २ ते ३ वर्षापर्यंत वापरता येते.
          – संजय काचोळे, जिल्हा कृषी अधीक्षक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page